सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पलटवार

| Updated on: Jan 10, 2021 | 1:39 PM

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय.

सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पलटवार
राज्यमंत्री अब्दुल सत्तार
Follow us on

पुणे: राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते. (Abdul Sattar’s reply to BJP leaders on the issue of security)

सध्या औरंगाबादच्या नामांतराचाही मुद्दा चांगलाच गाजतोय. त्या पार्श्वभूमीवर नामांतराला आपलं समर्थन असल्याचंही सत्तार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या बाबती भूमिका घेतली आहे. दोन्ही मित्रपक्षांशी चर्चा करुन यावर निर्णय घेतला जाईल असंही सत्तार म्हणाले. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांवर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला नाही, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

..तरच टोपी काढणार- सत्तार

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पाडल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेत रावसाहेब दानवे यांनी धोका दिल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केलाय. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जागा दाखवून दिल्याचा टोलाही सत्तारांनी लगावला आहे.

औरंगजेब आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही

औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. आता तर आपण शिवाजी महाराजांच्याच पक्षात आलो आहोत. समाजात तेढ निर्माण होण्यासाठी काही लोक पुड्या सोडतात, असंही सत्तार म्हणाले. त्याचबरोबर अजिंठा इथं शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधत असल्याचं सांगतानाच त्याचं काम जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सत्तार यांनी सांगितलं.

राज ठाकरेंना झेड (Z) वरुन (y+) सुरक्षा

सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार भाजप नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यांना यापूर्वी झेड (Z) सुरक्षा दिलेली होती. नव्या निर्णयानुसार त्याची ही सुरक्षा व्यवस्था काढली असून त्यांना यानंतर वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल.

फडणवीसांच्या जीवाला धोका, तरी सुरक्षेत कपात

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी यापूर्वी दिला होता. या अहवालात फडणवीसांच्या जीवाला अनेक बाजूने धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणेनं हा अहवाल दिलाय. असे असताना सुद्दा फडणवीसांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

संबंधित बातम्या:

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द; आठवलेंना एस्कॉर्टशिवाय वायप्लस सुरक्षा

Abdul Sattar’s reply to BJP leaders on the issue of security