जेवढं सहन झालं तेवढं सहन केलं नंतर…, शंभूराज देसाई यांचा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

जेवढं सहन झालं तेवढं सहन केलं नंतर..., शंभूराज देसाई यांचा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 17, 2022 | 12:38 AM

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई :  बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमची बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासूनच सांगत आहोत आम्ही शिवसेना सोडलेली नाही. ज्यांनी गेली अडीच तीन वर्ष वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारापासून फारकत घेतली. बाळासाहेबांच्या विचारांपेक्षा भिन्न विचारसरणी असलेल्या लोकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. हे सर्व शिवसैनिकांना त्रासदायक होत होतं. त्याचा गेली अडीच तीन वर्ष शिवसैनिकांना खूप त्रास झाला.

जेवढं आम्हाला सहन करता आलं तेवढ आम्ही सर्वांनी सहन केलं. मात्र जेव्हा ही परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे गेली तेव्हा आम्ही उठाव केला, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की, सामान्य शिवसैनिक आणि राज्यातील जनता ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांसोबतच असेल असं शंभूराज देसाई यांनी यांनी म्हटलं आहे.

पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाले देसाई?

दरम्यान यावेळी शंभूराज देसाई यांनी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. ठाकरे गटाच्या वतीने या जागेसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाच्या वतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की राज्यात अशा अनेक निवडणूका झाल्या आहेत. की अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर तिथे बिनविरोध निवडणूक न होता निवडणुका घ्याव्या लागल्या.

माझ्या स्वत:च्या मतदारसंघातीच उदाहरण पहा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण मतदारसंघाचं तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्त्व केलं. त्यांच्या निधनानंतर माझ्या वडिलांना उमेदवारी मिळाली. मात्र ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. दुर्दैवाने या निवडणुकीत माझ्या वडिलांचा पराभव झाल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.