Sunil Shelke News: शरद पवार गटाकडून कोणाचा फोन आला? आमदार सुनील शेळकेंचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार गटातून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चांवर मोठा गौप्यस्फोट केला आहे.

NCP Meeting: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 20-22 आमदार बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत असा सर्वात मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली असून सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन गेल्याची माहिती आहे. अशातच आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार गटातून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चांवर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सुनील शेळके काय म्हणाले?
“सुनील तटकरेंना कोण विलन करत आहे. मागील आठवड्यात आमची देवगिरीवर बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत सर्वांनी आपली मते मांडली. मतदारसंघातील अडचणी मांडल्या. त्यामाध्यमातून आपण एकसंघ आहोत हाच संदेश सर्व आमदारांनी एकत्र येऊन दिला आहे. आपण सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहोत हे आमदारांनी दाखवून दिलं आहे,” असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
‘आम्हाला कोणाचाही फोन नाही…’
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी आमदारांना शरद पवार गटातून संपर्क साधल्याच्या चर्चांवर मोठे विधान केले. “मी जाहीर आणि छातीठोकपणे सांगतो, आमचे कोणतेही आमदार कुणाच्याही संपर्कात नाहीत. आम्हाला शरद पवार यांचा किंवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही. संजय राऊत कधीपासून भविष्यवाणी करायला लागले मला माहिती नाही. आम्ही महायुतीच्या नेत्यांना भेटण्यात गैर काय?” असे म्हणत सुनील शेळके यांनी विलीकरण तसेच आमदार फुटण्याबाबतच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.
दरम्यान, आज सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व आमदार, नेते आहेत. दादांच्या खांद्याला खांदा लावून तटकरे साहेबांनी 40- ४५ वर्ष काम केले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं योगदान आहे. तटकरे साहेब, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार हे सर्व एकसंघ आहेत. आजच्या बैठकीत विलीनीकरणाचा कोणताही विषय नव्हता. दादांवर प्रेम करणारे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. मात्र दादांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहतो याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत, असंही सुनील शेळके यावेळी म्हणाले