लँडिंगदरम्यान विमानाचा थरकाप उडवणारा प्रकार! दोनदा धावपट्टीवर आदळली शेपटी; लँडिंगचा Video Viral
विमान हवेतच कलले, शेपटीचा भाग धावपट्टीवर दोनदा आदळला. हिथ्रो विमानतळावर ब्रिटीश एअरवेजच्या विमानाचे भयावह लँडिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला.

लंडनमधील हिथ्रो विमानतळावर ब्रिटिश एअरवेजच्या विमानाच्या लँडिंगदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. विमानाची शेपटी दोनदा धावपट्टीवर आदळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पुन्हा हवेत झेपावले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
ब्रिटिश एअरवेजचे BA431 हे विमान अॅमस्टरडॅमहून लंडनच्या दिशेने येत होते. Airbus A321neo प्रकारच्या या विमानातून सुमारे २०० प्रवासी प्रवास करत होते. गुरुवारी सकाळी जवळपास १०:३० वाजण्याच्या सुमारास विमान हिथ्रो विमानतळावरील टर्मिनल ५ येथे उतरण्याच्या तयारीत होते.
मात्र, लँडिंगच्या अगदी शेवटच्या टप्प्यात विमानाचा तोल जात असल्याचे दिसून आले. विमान आधी एका बाजूच्या चाकाने धावपट्टीला टेकले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूचे चाक जमिनीला लागले. याचवेळी विमानाचा मागील भाग म्हणजेच शेपटी थेट धावपट्टीवर आदळली. विशेष म्हणजे, हा प्रकार दोनदा घडला. विमान वाहतुकीच्या भाषेत या घटनेला ‘डबल टेल स्ट्राइक’ असे म्हटले जाते.
वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
विमानाची स्थिती लक्षात येताच वैमानिकाने लँडिंगचा प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याने विमान पुन्हा हवेत झेपावले. विमान वाहतुकीमध्ये या प्रक्रियेला ‘गो-अराउंड’ (Go Around) असे म्हणतात. त्यानंतर विमानाने पुन्हा एक फेरी मारली आणि सकाळी सुमारे १०:४९ वाजता सुरक्षितपणे लँडिंग केले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय?
या थरारक घटनेचा व्हिडीओ ‘BigJet TV’ च्या लाइव्हस्ट्रीममध्ये कैद झाला. व्हिडीओमध्ये विमान लँडिंगच्या वेळी जोरदार हेलकावे खाताना आणि त्याची शेपटी दोनदा धावपट्टीवर आदळताना स्पष्टपणे दिसते. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
पाहा, ब्रिटिश एअरवेजच्या विमानाच्या थरारक लँडिंगचा व्हायरल VIDEO!
This incident at Heathrow airport this morning is caught on camera. It must have been harrowing for the passengers.
— Andrew Bridgen (@ABridgen) November 12, 2026
ब्रिटिश एअरवेजकडून तपासात सहकार्य
या घटनेनंतर ब्रिटिश एअरवेजने विमान सुरक्षितपणे उतरल्याची माहिती दिली आहे. तसेच, ब्रिटनच्या एअर अॅक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रँच (AAIB) या तपास यंत्रणेला कंपनीकडून सहकार्य केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संबंधित विमान पुढील दोन दिवसांसाठी सेवेतून बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती आहे. लँडिंगच्या वेळी परिसरात जोरदार वारे वाहत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या घटनेमागचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
