MNS Protest LIVE | पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव

| Updated on: Sep 21, 2020 | 10:54 AM

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी सविनय कायदेभंग करत लोकलमधून प्रवास केला . (MNS Mumbai Local Protest)

MNS Protest LIVE | पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव
Follow us on

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली. मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनी रेल्वे प्रवास केला. तर ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांना ताब्यात घेतलं. मात्र काही तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. (MNS Mumbai Local Protest sandeep deshpande travel from train)

? कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर मनसेचं आंदोलन

मनसेच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याणमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

? बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने

लोकल ट्रेन सुरु करावी या मागणीसाठी मनसे कामगारांनी बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मुंबई पोलिसांच्या पथकाने त्यांना स्टेशनबाहेर थांबवले, रेल्वे स्थानकात जाण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना थांबवले आणि त्यांना परत पाठविले

? वाशीत रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन

वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सविनय कायदेभंग करत आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारला पुरुन-उरु आणि लोकलसेवा सुरु करु, असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

? अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांचा रेल्वे स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न

अंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रेन सुरू करा असे राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मनसेच्या लोकल प्रवास सविनय कायदेभंगाला मुंबई डबेवाला असोशिएशनकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलसेवा सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मनसे प्रमाणे आम्हाला लोकलने प्रवास करुन सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मुंबई डबेवाला असोशिएशनने दिला आहे.

नाकावर टिच्चून रेल्वे प्रवास – संदीप देशपांडे 

“सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळली. अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना रेल्वे प्रवास करु द्यावा, अशी तीन वेळा विनंती हात जोडून केली. “मला पाच मिनिटं द्या, मी रेल्वेतून प्रवास करतो. त्यानंतर माझ्यावर जो गुन्हा दाखल करायचा तो करा,” अशी विनंती अविनाश जाधव यांनी पोलिसांना केली. मात्र पोलिसांकडून त्यांना परवानगी मिळाली नाही.

“वेळ लागेल पण प्रवास होणार…मी रेल्वेतून प्रवास करणार,” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. जर परवानगी दिली नाही, तर गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला. या सर्व प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह 6 जणांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काही तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.

आंदोलनापूर्वी मनसैनिकांना पोलिसांच्या नोटीस 

मनसेच्या सविनय आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे. सर्व सामान्य लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आज होणाऱ्या आंदोलनाआधी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक माणसं दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कलम 149 आणि 144 प्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही यात म्हटलं आहे.(MNS Mumbai Local Protest sandeep deshpande travel from train)

संबंधित बातम्या :

Mumbai Local | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेकडून लोकल प्रवास