
Raj Thackeray On Badlapur School Rape Case : बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी काल गोंदियातील मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर बदलापूर प्रकरणावरुन मोठं वक्तव्य केले. माझ्या हाती सत्ता द्या, कोरा करकरीत महाराष्ट्र करुन दाखवतो, असे विधान राज ठाकरेंनी केले.
“बदलापूरचे प्रकरण मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढलं. अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन हादरलं. एकदा माझ्या हाती सत्ता द्या, पोलिसांना 48 तास फ्री हँड देतो. एकदा सत्ता दिली की कोरा करकरीत महाराष्ट्र करुन दाखवतो. पोलिसांना फ्री हँड दिला तर आई-बहिणींकडे बघायची कुणाचीही हिंमत होणार नाही”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. “माझ्या हाती सत्ता द्या, मी कोरा करकरीत महाराष्ट्र करुन दाखवतो”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास 12 तास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेतील एसआयटी गठीत करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणार्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे.
बदलापुरा झालेल्या लैंगिक अत्याचारा घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.