Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत शक्य, भिवंडीचे खासदार कपिल पाटलांचंही नाव चर्चेत

| Updated on: Jul 06, 2021 | 7:34 PM

महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरु झालीय. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत शक्य, भिवंडीचे खासदार कपिल पाटलांचंही नाव चर्चेत
खासदार कपिल पाटील
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी केंद्रातील काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरु झालीय. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (MP Kapil Patil’s name is also being discussed in the Union Cabinet expansion)

कपील पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

नारायण राणे दिल्लीत दाखल

8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. त्या पार्श्वभूमीवर राणे यांना आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आला त्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. राणे यांची जे. पी. नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

कोणाकोणाची वर्णी लागणार

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्र-बिहार-उत्तर प्रदेशला प्राधान्य

महाराष्ट्रातही राबवला जातोय सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’? सेना-भाजपचं सरकार निश्चित? काय घडतंय? वाचा सविस्तर

MP Kapil Patil’s name is also being discussed in the Union Cabinet expansion