छत्रपतींचे वंशज, मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख योद्धा, जाणून घ्या खासदार संभाजीराजेंची राजकीय कारकीर्द

| Updated on: May 19, 2021 | 4:37 PM

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही, गोळी असो की तलवार, पहिला वार माझ्यावर | MP Sambhaji raje chhatrapati

छत्रपतींचे वंशज, मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख योद्धा, जाणून घ्या खासदार संभाजीराजेंची राजकीय कारकीर्द
संभाजीराजे छत्रपती
Follow us on

मुंबई: सध्या राज्यात कोरोनानंतर दुसरा कुठला प्रमुख मुद्दा चर्चेत असेल तर तो म्हणजे मराठा आरक्षण. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे. या लढ्याचे नेतृत्व किंवा दिशा ठरवू शकतील अशा नेत्यांमध्ये संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje ) यांचे नाव अग्रस्थानी आहे. (MP Sambhaji raje chhatrapati political journey)

आता संभाजीराजे रुढार्थाने नेते नसले तरी छत्रपतींच्या घराण्यातील वंशज आणि राज्यसभेतील एक खासदार म्हणून त्यांच्यापाठी एक मोठा जनसमुदाय आहे. त्यामुळे आता इथून पुढल्या काळात संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व करतील, अशी चिन्हे दिसत आहेत. किंबहुना संभाजीराजे यांनी आता तशी पावलेही टाकायला सुरु केली आहेत. संयमी आणि अभ्यासू वृत्तीचे संभाजीराजे वेळ पडल्यास आक्रमक पवित्राही घेऊ शकतात हे आजपर्यंतच्या त्यांच्या अनेक भाषणांमधून दिसून आले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणाच्या लढाईत मराठा समाजाला विजय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत संभाजीराजे छत्रपती?

सध्या कोल्हापूर संस्थानाची धुरा सांभाळणाऱ्या शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे हे चिरंजीव आहेत. संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे. त्यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर 2016 साली भाजपच्या शिफारशीवरून राज्यसभेवर त्यांची राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. राज्यसभेवर जाणारे ते कोल्हापूरचे पहिले खासदार ठरले होते.

संयमी आणि अभ्यासू वृत्ती

संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले होते. या माध्यमातून संभाजीराजे यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून पुण्याई पाठिशी असली तरी त्या जोडीला संभाजीराजे यांचा वैयक्तिक असा करिष्माही आहे. याशिवाय, संयमी आणि अभ्यासू वृत्तीने व्यक्त होणे ही त्यांची आणखी एक जमेची बाजू मानली जाते.

रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन

मराठा आरक्षणाशिवाय आणखी एका गोष्टीमुळे संभाजीराजे छत्रपती लोकांशी जोडले गेले आहेत. ही गोष्ट म्हणजे रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन. तब्बल 15 वर्षांपासून ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. या सोहळ्याला दरवर्षी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी येतात. याशिवाय, रायगडाशी संबंधित अनेक उपक्रमांशी संभाजीराजे यांनी स्वत:ला जोडून घेतले आहे. या सगळ्यावर ते जातीने लक्ष ठेवून असतात. त्यामुळेच शिवप्रेमींच्या मनात संभाजीराजे यांना आदराचे स्थान आहे.

‘…तर मी माझी खासदारकी फेकून देतो’

मध्यंतरी रायगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती रोषणाई करण्यात आली. मात्र, या प्रकाशव्यवस्थेवर शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरुन शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संभाजीराजेंना दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह वाटतं, असा टोला लगावला होता. यानंतर संभाजीराजे यांनी आपण श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी टीका केली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पुरातत्व खात्याला खडे बोल सुनावताना त्यांनी रुद्रावतार धारण केला होता.

मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही. पण किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे. मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचं दाखवा, तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते.

‘संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही, गोळी असो की तलवार, पहिला वार माझ्यावर’

गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या नाशिकमधील सभेत बोलताना संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी उपस्थितांनी त्यांना मराठा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. तेव्हा संभाजीराजे यांनी म्हटले होते की, छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार.

राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊ दे. संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून मी जाईल, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.

‘तशी वेळ आली तर मी पहिली तलवार काढेन’

गेल्यावर्षी तुळजापुरात आयोजित सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्च्यात संभाजीराजे छत्रपती यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यावरून बराच राजकीय गदारोळही झाला होता. यावर संभाजीराजे यांनी स्पष्टीकरणही दिले होते.

तुळजापुरात आयोजित सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्च्यात मराठा समाज संतापलेला होता. राजे तुम्ही आम्हाला म्यानातून तलवारी काढण्याची परवानगी द्या, असा जनतेतून आक्रोश होता. या सगळ्याला आक्रमक वळण मिळू नये म्हणून मी जमावाला शांत करण्यासाठी तुम्हाला तलवार काढण्याची गरज नाही ,वेळप्रसंगी मी तलवार काढेन, असे म्हटले. मात्र, त्याचा विपर्यास करण्यात आला, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सामोपचाराची भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीराजे हे सातत्याने सामोपचाराची भूमिका घेताना दिसत आहेत.

सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आताच्या घडीला उद्रेक झाला तर त्याचा त्रास सामान्य माणसाला होऊ शकतो. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

(MP Sambhaji raje chhatrapati political journey)