मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सुप्रिया सुळेही बसल्या? राष्ट्रवादी काँग्रेसचा फॅक्टचेक! पडताळणीतून वास्तव उघड

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 24, 2022 | 10:41 AM

Supriya Sule Photo Controversy : या संपूर्ण वादग्रस्त फोटोप्रकरणी आता राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक झालीय. राष्ट्रवादीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यात आता शितल म्हात्रेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सुप्रिया सुळेही बसल्या? राष्ट्रवादी काँग्रेसचा फॅक्टचेक! पडताळणीतून वास्तव उघड
हाच तो वादग्रस्त फोटो...
Image Credit source: Twitter

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde Photo) यांच्या फोटोनंतर आता शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या फोटोची चर्चा रंगलीय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा आरोप करत आधी श्रीकांत शिंदे यांचा फोटो व्हायरल झाला होता. आता शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्वीट केलाय. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुचीत बसल्याचा दावा केला जातोय.

सुप्रिया सुळेंवर आरोप करत करण्यात आलेल्या या फोटो ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं शितल म्हात्रे यांनी ट्वीट केलेल्या फोटोचं फॅक्टचेकच केलंय. त्यातून समोर आलेलं सत्यही समोर आणलंय.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो हा मॉर्फ केलेला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. तसे दोन वेगवेगळे फोटोही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेत. फोटोत छेडछाड करुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सुप्रिया सुळे बसल्याचं भासवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलाय. गोव्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत याबाबतचा दावा केलाय.

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांना टीव्ही 9 मराठीने याबाबत विचारणा केली. त्यानंतर शितल म्हात्रे यांनीही आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्वीट केल्याचं म्हटलंय. आपण कुठेही सुप्रिया सुळेंच्या फोटोबाबत दावा केलेला नाही, तर सवाल विचारल्याचं शितल म्हात्रे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, या संपूर्ण वादग्रस्त फोटोप्रकरणी आता राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक झालीय. राष्ट्रवादीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यात आता शितल म्हात्रेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना याबाबत माहिती दिलीय.

फोटोच्या वादावर सक्षणा सलगर यांनी शितल म्हात्रे यांच्यावर जोरदार टीकाही केली. खोके घेऊन ओके झालेल्या दलबदलू लोकांबद्दल फारसं बोलण्याची गरज नाही. गल्लीतल्या नेत्यांवर बोलण्यापेक्षा सुप्रिया सुळे दिल्लीत राज्याचं प्रतिनिधित्व करतात. त्याबाबत शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी केलेलं ट्वीट हे अयोग्य असल्याचं म्हणत या ट्वीटचा सक्षणा सलगर यांनी तीव्र शब्दांत निषेधही व्यक्त केला.

दरम्यान, शुक्रवारी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेलो नव्हतो, असं स्पष्टीकरणही दिलं होतं. घरातील कार्यालयात असलेल्या खुर्चीत आपण बसलो होतो, असं स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदे म्हणाले होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI