पवार, गडकरी यांनी राज्यपालांच्या निषेध का नाही केला? उदयनराजे आक्रमक, पंतप्रधानांना लिहिले पत्र…

| Updated on: Nov 24, 2022 | 2:53 PM

पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे. या दोघांचाही मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं उदयनराजे म्हणाले.

पवार, गडकरी यांनी राज्यपालांच्या निषेध का नाही केला? उदयनराजे आक्रमक, पंतप्रधानांना लिहिले पत्र...
Image Credit source: social media
Follow us on

पुणेः छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज आक्रमक भूमिका मांडला. एका पक्षाचा खासदार नव्हे तर एक शिवभक्त म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहे.

राज्यपालांकडून शिवरायांच्या विचारांचा अवमान होत असताना शरद पवार आणि नितीन गडकरी त्याच व्यासपीठावर होते. तरीही त्यांनी निषेध का केला नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. त्या विषयाचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचं म्हटलं आहे. लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींची या विषयावरून भेट घेणार असल्याचंही उदयनराजे यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे. या दोघांचाही मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं उदयनराजे म्हणाले.

पत्रात त्यांनी लिहिलंय…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे. पण पुर्वीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजाना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केल होते. शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांचा जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वतः बदलायला तयार नाहीत.
2014 साली आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा भव्य असा पायाभरणी समारंभ केलात. इतकच नाही तर भारतीय नौदालाचा ध्वज शिवरायांना अर्पण केलात. या निर्णयाने लाखो शिवप्रेमी आनंदलेले असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र अशोभनीय वर्तन केले आहे, हे खेदाने नमूद करावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरून दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यांवर योग्य ती कार्यवाही कराल याची मला खात्री आहे.... असं पत्र उदयनराजे यांनी लिहिलंय.