Parliament Session : गणेशोत्सव काळात अधिवेशन घेताय, विसरू नका, गणपती हे लोकशाहीचं दैवत; राऊतांचा मोदींना टोला
Saamana Editorial on Parliament Special Session 2023 : गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन घेताय, पण विसरू नका, गणपती हे लोकशाहीचं दैवत; गणपती, संसदेचं विशेष अधिवेशन अन् लोकशाही, सामनातून संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात संसदेचं अधिवेशन बोलावल्याने विरोधक मोदी सरकावर टीका करत आहेत. तर काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा असल्याने मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावल्याची टीका होत आहे. या संसदेचं विशेष अधिवेशनावर आजच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून निशाणा साधण्यात आला आहे.श्री गणपतीची लोकशाही या शीर्षकाखाली आजचं ‘रोखठोक’ सदर प्रसिद्ध झालं आहे. गणेशोत्सवाच्या काळात अधिवेशन घेताय, पण विसरू नका, गणपती हे लोकशाहीचं दैवत आहे, असं सामनाच्या ‘रोखठोक’ सदरात म्हणण्यात आलं आहे.
सामनाचं ‘रोखठोक’ सदर जसंच्या तसं
संसदेच्या विशेष अधिवेशनाची सुरुवात पंतप्रधान मोदी गणेश पूजनाने करतील. गणपती हे लोकशाहीचे दैवत हे बहुधा मोदी विसरलेले दिसतात. प्राचीन भारतात ‘गणराज्य’ व्यवस्था होती. ती एक संघराज्य पद्धती होती. त्या संघराज्यांचा ‘सेनापती’ गणपती होते. लोकशाही तेथे नांदत होती. आता संघराज्य पद्धती मोडून काढली जात आहे. गणपती उत्सवात यावर चर्चा व्हायला हवी!
दिल्लीतील नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा गणेश पूजनाने होईल. ऐन गणपतीत पंतप्रधान मोदी यांनी संसदेत राजकीय गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन त्यासाठीच आहे. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांचे प्रश्न कमी व सार्वजनिक, धार्मिक उत्सव जास्त करीत आहेत. संसदेत गणेश पूजन झाले तरी 2024 साली भाजपची संसदेत पुनर्स्थापना होणार नाही हे श्री गणपतीच्याच मनात आहे.
गणपती हे लोकशाहीचे दैवत आहे हे बहुधा श्री. मोदी यांच्या स्मरणात नसावे. इंग्रजांची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांची योजना आखली. लोकांनी एकत्र जमावे. देशाविषयी विचार करावा, निर्णय घ्यावा. लोकांना गुलामी व जुलमाबाबत मुक्तपणे बोलता यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्याच गणपतींच्या मेळ्यांतून तेव्हा वीर चापेकर बंधू निर्माण झाले. त्याच गणेशाचे पूजन पंतप्रधान मोदी नव्या संसद भवनात करणार आहेत, पण या वास्तूच्या पहिल्या उद्घाटनाला त्यांनी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही. कारण त्या आदिवासी आहेत व आज भाजपचे लोक सनातन धर्मावर बोलत आहेत.
गणपती हे लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. आज लोकशाही व्यवस्थेत देशाचे राष्ट्रपती महत्त्वाचे आहेत. त्याच प्रकारे प्राचीन भारतात गणव्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेचा प्रमुख गणपती होता. जो राजा किंवा सम्राट होता त्यास गणपती ( गण ) म्हणजे प्रजापती बोलत असत. ती एक संघराज्य पद्धती होती व लोकशाही पद्धतीने काम चालत असावे.
चंद्रावर स्वर्ग नाही. नरकही नाही. सर्व काही इथेच आहे. भारतात लोकशाहीचा नरक झालेला आपण पाहत आहोत. एका सज्जन व्यक्तीने ओशोला विचारले, “असे किती नरक असतात?” ओशो म्हणाले, “जितके नरक उभारायचे तितके असू शकतात. कुणाचं एका नरकाने भागतं. कुणाला दोन पुरत नाहीत. कुणाला तीन कमी पडतात.
हे व्यक्तीगणिक बदलत असतात. तुमचा अहंकार, तुमचा हव्यास जेवढा मोठा तेवढे नरक उभारणे भाग पडते. नरक म्हणजे काय? त्या अहंकार आणि हव्यासाच्या पायऱ्या आहेत.” सध्या भारतात याच पायऱ्यांवर आपण सगळे उभे आहोत. चंद्रावर स्वर्ग नाही. म्हणून भक्तांनी उभारलेल्या मंडपातील स्वर्गात गणपती महाराज अवतरणार आहेत. गणपतीच्या लोकशाहीचा पृथ्वीवर नरक झाला आहे. तेवढा दुरुस्त करून त्यांनी जावे इतकेच!