Municipal Election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!

| Updated on: Sep 23, 2021 | 8:46 PM

3 सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. प्रभाग पद्धतीने भाजपला मिळालेले यश पुन्हा मिळू नये यासाठी दोन सदस्यांची वार्ड रचना करण्याचा मनसुबा अजित पवारांचा होता.

Municipal Election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. या 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. प्रभाग पद्धतीने भाजपला मिळालेले यश पुन्हा मिळू नये यासाठी दोन सदस्यांची वार्ड रचना करण्याचा मनसुबा अजित पवारांचा होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी एकत्र येत अजित पवारांना शह दिल्याचं मानलं जात आहे. (NCP on backfoot in Pune, Pimpri-Chinchwad due to 3 member ward system)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन नगरसेवकांचा वॉर्ड करू अशी भूमिका अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनेक वेळा घेतली आहे. मात्र ऐन निर्णयाच्या वेळेस एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी एकत्र येत तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय लावून धरला. अखेर तोच निर्णय मान्य करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली आहे. ज्यांनी धास्ती घेतली होती त्या भाजपाला सुखद धक्का बसलाय. आता ही निवडणूक जिंकायला आम्हाला काहीच अडचण नाही, असं पुण्याच्या महापौरांना वाटतं.

3 सदस्यीय प्रभाग रचनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस नाराज?

महाविकास आघाडी म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल तीनही पक्षांच्या नेत्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र, अजित पवार यांना आपला निर्णय राबवताना न आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा काय निर्णय होतो त्यावर ही निवडणूक होईल. तसंच काहीही झालं तरी भाजप सत्तेबाहेर राहील याची पुरेपूर खबरदारी आम्ही घेऊ, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीला झटका बसण्याची शक्यता

महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोड्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला तीनचा प्रभाग झाल्याने काहीसा झटका बसेल, असं सध्याचे राजकीय चित्र आहे. जर दोन सभासदांचा प्रभाग झाला असता तर परिस्थिती राष्ट्रवादीच्या बाजू झुकलेली असती. आता मात्र तीन सदस्यीय प्रभाग झाल्याने भाजपाला झुकते माप मिळाल आहे आणि राष्ट्रवादीसमोरील आव्हान अजून कठीण झालं आहे.

काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत 2 सदस्यीय प्रभार रचनेचा ठराव

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद झाल्याची चर्चा

प्रभाग रचनेवरुन मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यी प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती. हे नेते आपल्या मागणीवर अडून होते. मात्र शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यममार्ग काढत 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देऊ, काँग्रेस कार्यकरिणी बैठकीत ठराव मंजूर

प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा घणाघात, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं आवाहन

NCP on backfoot in Pune, Pimpri-Chinchwad due to 3 member ward system