प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा घणाघात, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं आवाहन

महापालिकेच्या या प्रभाग रचनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावं, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा घणाघात, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं आवाहन
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष


नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. महापालिकेच्या या प्रभाग रचनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावं, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. (Raj Thackeray criticizes Mahavikas Aghadi government over ward system)

‘2012 मध्ये जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यापूर्वी प्रभाग नावाची काही गोष्टच नव्हती. तेव्हा सगळीकडे एकच उमेदवार होता. त्यावेळी त्यांनी दोन उमेदवाराचा एक प्रभाग अशी पद्धत सुरु केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी 4 सदस्यीय प्रभाग केला. आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला की परत 1 सदस्यीच प्रभाग करा. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला कळवलं त्यातही 1 सदस्यीयच प्रभाग रचना होती. आता काल यांनी ठरवलं की 3 सदस्यीय प्रभाग करायचा. मुळात देशात अशी कुठलीही पद्धत नाही. कायद्याप्रमाणे तुम्ही पाहिलं तर देशात, कुठल्याही राज्यात अशा प्रभाग पद्धतीनं निवडणूक लढवली जात नाही. कायद्याप्रमाणे पाहिलं तर खासदार, आमदार, महापालिका अगदी ग्रामपंचायतीलाही एकच उमेदवार आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरु झालं आणि का, याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबिज करणे’, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय.

‘हे सगळं राजकीय फायद्यासाठी सुरु’

‘आपल्याला पद्धतीने, आपल्या सोयीने प्रभाग तयार करणे आणि त्यातून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्याचा त्रास लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायचं सोडून 3 – 3 उमेदवारांना मतदान का करायचं? म्हणजे सर्व जनतेला गृहित धरायचं, आपल्याला हवे त्या पद्धतीनं प्रभाग करायचे, खरं तर हे योग्यच नाही, कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे. इथं महाराष्ट्राचा कायदा वेगळा आणि देशाचा कायदा वेगळा असं काही आहे का? हे दोनचे प्रभाग, तीनचे प्रभाग, चारचे प्रभाग कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही तीन-तीन आमदार, तीन-तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? हे सगळं यांच्या फायद्यासाठी सुरु आहे’, असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय.

निवडणुका मॅनेज होत असल्याचा आरोप

‘राजकीय पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवू, सगळं करु. पण माझी विनंती आहे की लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं. या प्रभाग रचनेत कुठलाही नगसेवक दुसऱ्या नगरसेवकाला काम करु देत नाही. एखाद्याने कुठला प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो. त्यामुळे प्रभागात कामं होत नाहीत. उद्या लोकांना वाटलं तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं त्यांनी? या लोकांनी पूर्ण निवडणुकीची थट्टा करुन ठेवली आहे. माझी विनंती आहे जनतेला की हे जे तुम्हाला गृहित धरलं जात आहे त्यावर लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे. या सगळ्या प्रकारामुळे निवडणूका 100 टक्के मॅनेज होतात. प्रभाग रचना सातत्याने बदलली याचं कारण नेमकं सरकारनं सांगितलं पाहिजे’, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय.

इतर बातम्या :

कार्यकर्ते म्हणाले ‘आमचे सोडून सगळ्यांचे होर्डिंग्स लागतात’, मग राज ठाकरेंचं उत्तर काय?

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला, राष्ट्रवादी-शिवसेना नाराज, फडणवीसांनीही कोंडीत पकडलं!

Raj Thackeray criticizes Mahavikas Aghadi government over ward system

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI