राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला, राष्ट्रवादी-शिवसेना नाराज, फडणवीसांनीही कोंडीत पकडलं!

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला, राष्ट्रवादी-शिवसेना नाराज, फडणवीसांनीही कोंडीत पकडलं!
नाना पटोले, बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस


मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरुन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे.सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. (Nana Patole, Balasaheb Thorat to meet Devendra Fadnavis for Rajya Sabha elections)

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने रजनी पाटील तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. मात्र एखाद्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी ही परंपरा आहे अशी काँग्रेसची भावना आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास नाही?

राज्यात होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळेच राष्ट्रवादी-शिवसेना नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का? ज्यामुळे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंत्या कराव्या लागल्या?

राष्ट्रवादी-शिवसेना नाराज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपचे निलंबित 12 आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

पटोले, थोरात फडणवीसांच्या भेटीला

दरम्यान, काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या विरोधातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल. संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपची कोअर कमिटी निर्णय घेईल- फडणवीस

‘आमच्या पक्षात कुठलाही निर्णय मी एकटा करत नाही. पक्षाच्या कोअर कमिटीशी मी चर्चा करेल आणि त्या आधारावरच निर्णय होऊ शकतील. आता तरी कोअर कमिटीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आम्ही फॉर्म भरल्याचं फडणवीस म्हणाले. दरम्यान, भाजपचं संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतेय. त्याबाबत विचारलं असता निवडणूक बिनविरोध व्हायची असेल तर त्यांनी त्यासाठी नक्की प्रयत्न करावा. आम्हाला प्रतिप्रश्न करुन निवडणूक कशी बिनविरोध होईल? भारतीय जनता पक्षाने काही विचार करुनच फॉर्म भरला असेल. समजा उद्या नाही लढवायची असंही कोअर कमिटीच ठरवेल’, असं फडणवीसांनी मंगळवारी स्पष्ट केलं होतं.

इतर बातम्या :

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Nana Patole, Balasaheb Thorat to meet Devendra Fadnavis for Rajya Sabha elections

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI