Abu Azmi : …तर गांधीजींबद्दल आदर वाढला असता, फाळणीवरुन अबू आझमींच वक्तव्य

"पंतप्रधान म्हणतात 35 कोटी लोक दारिद्रय रेषेखाली आले. असे असेल तर 85 कोटी लोकांना मोफत धान्य का दिले जातेय? देशात गरीब आणि श्रीमंती मध्ये मोठी दरी आहे. राज्यात बांगलादेशी येतात कुठून? काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आणते का ?" अबू आजमी यांचा सरकारला सवाल

Abu Azmi : ...तर गांधीजींबद्दल आदर वाढला असता, फाळणीवरुन अबू आझमींच वक्तव्य
Abu Azmi
| Updated on: Nov 27, 2025 | 10:42 AM

समाजवादी पार्टीने कोकणाच्या राजकारणात प्रवेश केला आहे. चिपळूण नगर परिषदेमध्ये थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी त्यांचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. समाजवादी पार्टीचे आमदार आणि नेते अबू आझमींची तोफ कोकणात कडाडली. चिपळूण नगर पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सपाच्या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी चिपळूणमध्ये सभा घेतली. “देशाच्या फाळणीचा कागद गांधीजींनी फाडून रद्दीच्या टोपलीत टाकला असता तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता. हिंदू-मुस्लिम फाळणी झाली हे सर्वात वेदनादायी” असं अबू आझमी म्हणाले. ‘जे लोक इंग्रजांच्या पायाचे तळवे चाटायचे ते लोक आज सत्तेत बसलेत’ अबू आझमीनी या शब्दात भाजपवर टीका केली.

“सावंतवाडी येथे मुस्लिम समाजाच्या तरुणाला छळ करून मारले. त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि चार फुटाच्या अर्धवट डोक्याचा मंत्री मशिदीत घुसून मारण्याचा इशारा देतो. त्यावर सरकार काही बोलत नाही” अबू आझमी यांची नितेश राणे यांच्यावर घणाघाती टीका.”मुंबईतील सिरियल ब्लास्ट मधील आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडल्यावर हुशार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोर्टात धाव घेतली, पण मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग यांचा हस्तक्षेप असताना देखील पुरावे असून कोर्टाने निर्दोष सोडल्यावर मुख्यमंत्री शांत बसले. देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात जाणीवपूर्क द्वेष निर्माण केला जातोय” असा आरोप अबू आझमी यांनी केला.

देशात मुस्लिम होणे म्हणजे गुन्हा झाला आहे

“साध्वी प्रज्ञा सिंग यांना वाचवण्यासाठी कोर्टामध्ये वकिलावर दबाव होता हे जाहीरपणे सिद्ध झाले. स्फोटातील साक्षीदारांवर दबाव आणण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग यांना पकडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंसह नरेंद्र मोदी ओरडून सांगत होते की प्रज्ञासिंग बॉम्बस्फोट करू शकत नाही हे काम मुस्लिम लोकांचे आहे. देशात मुस्लिम होणे म्हणजे गुन्हा झाला आहे” असं अबू आझमी म्हणाले.

सरकारने चिल्लूभर पाण्यात डुबून मरायला हवं

“सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. सरकारने चिल्लूभर पाण्यात डुबून मरायला हवं. शेतकरी मेला तर तुमच्या नशिबात एक दाणा नसेल. शेतकऱ्यांची थकबाकी राहिली तर तत्काळ कारवाई केली जाते आणि उद्योजकांना कोटींची कर्जमाफी दिली जाते” असं अबू आझमी म्हणाले.

तर त्याला दहा लाख

“जर चांगल्याचीची जबाबदारी घेत असाल, तर वाईटाची पण जबाबदारी घ्या. लव्ह जिहाद वरून अबू आझमींची नितेश राणेंवर टीका. “मुस्लिम तरुणी सोबत एखाद्या हिंदू तरुणाने लग्न केलं तर त्याला दहा लाख देता आणि एखाद्या हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणाशी लग्न केलं तर तिच्यावर दबाव आणून गुन्हे दाखल करता” असा आरोप अबू आझमी यांनी केला.