नागपूरचे महापौर संदीप जोशींच्या कारवर गोळीबार, जोशींसह कुटुंब सुखरुप

| Updated on: Dec 18, 2019 | 8:01 AM

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर काल रात्री बारा वाजताच्या सुमारास गोळीबार झाला, सुदैवाने जोशी यातून बचावले आहेत

नागपूरचे महापौर संदीप जोशींच्या कारवर गोळीबार, जोशींसह कुटुंब सुखरुप
Follow us on

नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर काल (मंगळवारी) रात्री जीवघेणा हल्ला (Nagpur Mayor Sandeep Joshi Attack) करण्यात आला. संदीप जोशी यांच्या गाडीवर बाईकस्वार हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने जोशी आणि त्यांचं कुटुंब या हल्ल्यातून सुखरुप बचावलं आहे. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

संदीप जोशी यांच्या गाडीवर काल रात्री बारा वाजताच्या सुमारास गोळीबार झाला. वर्धा रोडवर एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ ही घटना घडली. जामठा भागातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटहून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी जोशींच्या गाडीवर गोळ्या झाडल्या.

संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींना अटक झालेली नाही. मात्र महापौरांवरच हल्ला झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नोव्हेंबर महिन्यात संदीप जोशी यांच्याकडे नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संदीप जोशी हे भाजपच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत संदीप जोशी यांनी काँग्रेसच्या हर्षदा साबळे यांचा दणदणीत पराभव केला होता. संदीप जोशी यांना सव्वा वर्षांसाठी महापौरपद देण्यात आलं आहे.

भारतातील सर्वात सुरक्षित कारचा अपघात, कारचा चक्काचूर, इंजिन थेट रस्त्यावर

पदभार स्वीकारल्यानंतर संदीप जोशी यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चार डिसेंबरला संदीप जोशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती.

कोण आहेत संदीप जोशी?

संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावरच होती.

हिवाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व आमदार आणि मंत्री सध्या नागपुरात आहेत. त्यामुळे कानाकोपऱ्यात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या महापौरांवर झालेल्या हल्ल्याकडे गंभीर दृष्टीने पाहिले जात आहे.

नागपुरात गुन्हेगारी फोफावली

नागपुरात गुन्हेगारांचा सुळसुळाट झाल्याचं गेल्या काही वर्षांत पाहायला मिळत होतं. बलात्कार, हत्या, अपहरण, गुंडगिरी यांनी डोकं वर काढल्यामुळे गुन्हेगारी फोफावली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयाचीही जबाबदारी स्वीकारली होती, परंतु त्यांना स्वतःच्याच होमग्राऊण्डवर गुन्हेगारी रोखण्यात अपयश आल्याने टीकेला सामोरं जावं लागत होतं.

ठाकरे सरकारमध्ये गृह मंत्रालयाची धुरा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता शिंदेंना गुन्हेगारीवर वचक बसवण्यात यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.

Nagpur Mayor Sandeep Joshi Attack