Nagpur Mahasabha LIVE | तुकाराम मुंढे महासभेला हजर, नागपूर मनपाची सभा वादळी ठरण्याची चिन्हं

| Updated on: Jun 23, 2020 | 12:12 PM

नागपूर महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे.

Nagpur Mahasabha LIVE | तुकाराम मुंढे महासभेला हजर, नागपूर मनपाची सभा वादळी ठरण्याची चिन्हं
Follow us on

नागपूर : नागपूर महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेतून आयुक्त तुकाराम मुंढेंनी वैयक्तिक टिपण्णीच्या रागातून सभात्याग केला होता. त्यामुळे ते आजच्या सभेला उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर दुपारी बाराच्या सुमारास ते सभागृहात दाखल झाले. (Nagpur Mayor vs Commissioner Mahasabha)

नागपुरातील भट सभागृहात आज महानगरपालिकेची महासभा आहे. 20 तारखेच्या सभेतून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केल्यानंतर, आज ते येणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवाय आजची सभा वादळी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज भट सभागृहाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 11 अधिकारी आणि 40  पेक्षा जास्त पेलीस कर्मचारी तैनात आहेत.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी सर्वसाधारण सभा अर्धवट सोडून गेल्यावर संस्थगित झालेली सभा आज होत आहे.  शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोपांच्या फैरी आणि वैयक्तिक टिकेमुळं मुंढे सभा अर्धवट सोडून गेले होते. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

मुंढे निघून गेल्यामुळं सभा संस्थगित करावी लागली होती. आज ही सभा होते आहे. त्यामुळं या सभेला मुंढे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 11 वाजता भट सभागृहात ही सभा नियोजित होती. सभेला उपस्थित राहावं यासाठी महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना पत्र लिहलं होतं. तर दुसरीकडे स्मार्ट सिटी प्रकल्पात अधिकार नसताना मर्जीतल्या कंत्राटदाराला परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप करत महापौरांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा वादळी होणार, अशी दाट शक्यता आहे.

“मुंढेंनी सभागृहात यावं ही हात जोडून विनंती”

सभागृहात प्रश्न विचारणे हा सदस्यांचा अधिकार आहे. महासभेत माझी भूमिका कायद्यानुसार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना मंगळवार, 23 जूनला होणाऱ्या महासभेत यावं, अशी हात जोडून विनंती नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी काल केली होती.

मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सभात्यागाचं कारण सांगत अनेक गौप्यस्फोट केले होते. मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणणाऱ्यांना काय उत्तर देऊ, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी महापौर आणि नगरसेवकांवर अधिकाऱ्याचं खच्चीकरण केल्याचा, अधिकाऱ्याला बोलू न दिल्याचा आणि व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचाही गंभीर आरोप केला.

आयुक्त तुकाराम मुंढे माझे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. त्यांनी मला शहाणपण शिकवू नये, अशा शब्दात महापौर जोशी यांनी मुंढे यांच्यावर टीका केली होती. व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचा आरोप करत तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला होता.

(Nagpur Mayor vs Commissioner Mahasabha)
संबंधित बातम्या

Tukaram Mundhe Exclusive | मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे

Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर, आयुक्तांनी समजूतदारपणे घ्यायला हवं होतं, महापौरांची प्रतिक्रिया