नाना पटोलेंसह काँग्रेसच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

| Updated on: May 26, 2019 | 8:36 AM

नागपूर : काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंसह इतर कार्यकर्त्यांनी नागपूर मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लोकसभा निकालादिवशी नाना पटोले पिछाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकरणावरुन पोलिसांनी नाना पटोलेंसह काँग्रेसच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

नाना पटोलेंसह काँग्रेसच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Follow us on

नागपूर : काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंसह इतर कार्यकर्त्यांनी नागपूर मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लोकसभा निकालादिवशी नाना पटोले पिछाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकरणावरुन पोलिसांनी नाना पटोलेंसह काँग्रेसच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर घोषणा देत वाद घातला होता. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली होती. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने नाना पटोले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार कळमाना पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरुन नाना पटोले आणि काँग्रेस कार्यकर्ते अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशांत पवार यांच्याविरोधात कळमाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे नाना पटोलेंना मतमोजणी दरम्यानचा वाद  चांगलाच भोवणार आहे.

नाना पटोले हे काँग्रेसकडून नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात होते. पटोलेंच्या विरोधात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघानंतर भाजपसाठी नागपूर देशातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ मानला गेला. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय याच मतदारसंघात आहे. शिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळेच नागपूरची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि तेवढीच महत्त्वाची होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी तगडं आव्हान उभं केलं होतं. पटोलेंच्या आव्हानाची चाहूल लागल्यानेच गडकरींसारख्या तगड्या नेत्यासाठीही भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा झाल्या. तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सभा घेतल्या होत्या.