देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक : नाना पटोले

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे (Nana Patole slams Devendra Fadnavis over Maratha Reservation).

देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक : नाना पटोले
| Updated on: Mar 09, 2021 | 11:23 PM

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. “सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणासंदर्भात कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा हा या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणविसांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी केंद्राला सांगून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे (Nana Patole slams Devendra Fadnavis over Maratha Reservation).

‘भाजपचा दावा खोटा’

“मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आरक्षण दिले पण ते महाविकास आघाडी सरकारला कोर्टात टिकवता येत नाही, अशी ओरड भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. पण भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा दावा निखालस खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान उघड झाले आहे”, असं नाना पटोले म्हणाले (Nana Patole slams Devendra Fadnavis over Maratha Reservation).

‘केंद्रातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे’

“काँग्रेस पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असून त्यासंदर्भात मोठ्यातले मोठे वकील लावायचे असल्यास सरकारने लावावे आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावरील राजकारण थांबवून केंद्रातील आपल्या पक्षाच्या सरकारला सांगून ठोस भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे”, अशी मागणी त्यांनी केली.

‘भाजपला आरक्षण संपवायचंय’

“मराठा आरक्षणाचा गुंता हा भारतीय जनता पक्षानेच वाढवून ठेवला आहे. हे 8 मार्चला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतून उघड होत आहे. सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे, हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आरक्षणच संपुष्टात आणावयाचे आहे हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी अशी षडयंत्रे रचली जात आहेत”, असा घणाघात प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला.

हेही वाचा : गोव्यातील 50 लाखांचं मद्य निरेत पकडलं, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई