अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत

| Updated on: Sep 09, 2020 | 4:48 PM

उदयसिंग पाडवी हे 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार व्हाया काँग्रेस राष्ट्रवादीत
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला आहे. (Nandurbar Former BJP MLA Udaysingh Padvi enters NCP)

उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कोण आहेत उदयसिंग पाडवी?

उदयसिंग पाडवी हे 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहाद्यातून उदयसिंग यांच्याऐवजी पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट दिलं.

उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उदयसिंग पाडवी यांनी पक्षांतर करत काँग्रेसचा झेंडा हाती धरला होता. त्यानंतर पाडवींना मतदारसंघही बदलून मिळाला. त्यामुळे शहादाऐवजी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना मतदारांनी कौल दिला नाही.

नंदुरबार मतदारसंघातून त्यांनी भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 87 हजार 373 मतदान झालं होतं. भाजपच्या विजयकुमार गावित यांना 94 हजार 442 मतं मिळाली होती, तर उदयसिंग पाडवी यांना 35 हजार 39 मते मिळाली होती. काँग्रेसमध्ये मात्र ते अल्पकाळ थांबले.

उदयसिंग पाडवी भाजपमध्ये असताना नंदुरबार जिल्ह्यात अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. उदयसिंग पाडवी आणि तत्कालीन खासदार यांच्यात अंतर्गत कुरबुरी अनेक वेळा उघड झाल्याने त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत असे. (Nandurbar Former BJP MLA Udaysingh Padvi enters NCP)

पक्षप्रवेशावेळी अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते. (Nandurbar Former BJP MLA Udaysingh Padvi enters NCP)