
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी सहायक पोलीस सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. याच प्रकरणावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय (Narayan Rane deman CM Uddhav Thackeray resignation). राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
“हे भयावह आहे, पोलीस आयुक्त झालेले अधिकारी, महासंचालक स्थरावरचा अधिकारी, गृहमंत्र्यांचं नाव घेऊन सांगतो, तो सरळसरळ गृहमंत्र्यांवर आरोप करतोय. गृहमंत्र्यांनी सांगितलेलं काम सचिन वाझे करत होते”, असं राणे म्हणाले.
“सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही? मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या शंभर कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. वाझेंना वाचवायचंही काम मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणं आवश्यक आहे”, अशी भूमिका राणे यांनी मांडली.
“महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतोय. कायदा आणि सुव्यवस्था नाही. विकास ठप्प झालाय. पोलीसच गुन्हे करु लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी माझी अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती”, असंही राणे यांनी यावेळी केली.
संबंधित बातम्या :
गृहमंत्र्यांच्या ‘वसुली’ आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर, पत्रातला 10 नंबरचा मुद्दा वाचलात का?