नारायण राणे गांधी जयंतीच्या दिवशी मुलांसह भाजपात : सूत्र

| Updated on: Sep 29, 2019 | 5:13 PM

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane BJP Entry) बहुप्रतिक्षित भाजप प्रवेशाला मुहुर्त मिळाला आहे. नारायण राणे 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या (Gandhi Jayanti) दिवशी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

नारायण राणे गांधी जयंतीच्या दिवशी मुलांसह भाजपात : सूत्र
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane join BJP) बहुप्रतिक्षित भाजप प्रवेशाला मुहुर्त मिळाला आहे. नारायण राणे 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या (Gandhi Jayanti) दिवशी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. असं असलं तरी शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) बोलल्याशिवाय असा कोणताही निर्णय होणार नाही, असं म्हटलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले, “गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणेंसारख्या व्यक्तीला भाजप प्रवेश देईल असं वाटत नाही. या व्यतिरिक्त नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंशी बोलूनच निर्णय घेणार आहेत. अजून तरी त्यांचं उद्धव ठाकरेंशी काहीही बोलणं झालेलं नाही.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणेंचा भाजप प्रवेश 2 ऑक्टोबरला निश्चित झाला आहे. हा भाजप प्रवेश मुंबईतच दुपारी 4 वाजता होईल, अशीही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंसोबत त्यांचे दोन्ही मुल नितेश राणे आणि निलेश राणे हेही भाजप प्रवेश करतील. आमदार नितेश राणे 1 ऑक्टोबरला (मंगळवारी) मुंबईत आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन (Narayan Rane Join BJP) करणार असल्याची चर्चा आहे. राणेंसोबतच त्यांचे दोन्ही चिंरजीव निलेश आणि नितेश राणेही भाजपात जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यापूर्वी राणे पिता-पुत्रांकडून सिंधुदुर्गात महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं होतं.

महाजनादेश यात्रेदरम्यान राणे म्हणाले होते, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येत असताना त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याने भविष्याकडे पाहून मी त्यांचे स्वागत केले. मातोश्रीच्या दृष्टीकोनातून त्यांचा सन्मान करावा, स्वागत करावं या स्तुत्य भावनेने मी त्यांचे स्वागत केले.”