लोक कोंबडीवाला म्हणून उल्लेख करतात, नारायण राणे असं का म्हणाले?
माजी मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. गेली कित्येक दिवस ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा पक्षबदल केला. मात्र अजूनही त्यांचे राजकीय महत्त्व कमी झालेले नाही.

Narayan Rane : माजी मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. गेली कित्येक दिवस ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा पक्षबदल केला. मात्र अजूनही त्यांचे राजकीय महत्त्व कमी झालेले नाही. कोकणात तर त्यांची वेगळी ताकत आहे. दरम्यान याच नारायण राणे यांनी भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा, असं विधान केलंय. तसेच आपल्या व्यवसायाचं उदाहरण देताना त्यांनी काहीजण आम्हाला कोंबडीवाला म्हणतात असंही सांगितलंय.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
“मी 1982 सालापासून मुंबईत चिकनचा व्यवसाय करतोय. हा व्यवसाय आता भाऊ करतो. आम्ही फक्त गल्ल्यावर बसतो. कापणारे वेगळे असतात. काही लोक कोंबडीवाला म्हणून आमचा उल्लेख करतात,” असं नारायण राणे यांनी सांगितलं.
औषधावर 15 टक्के पैसे खाण्यापेक्षा…
तसेच, “भ्रष्टाचार करण्यापेक्षा कोणताही व्यवसाय केलेला बरा. करोना महासाथीच्या काळात औषधावर 15 टक्के पैसे खाण्यापेक्षा हा व्यवसाय बरा आहे. कोण पैसे खातायत हे तुम्हाला माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येण्याने…
पुढे बोलताना त्यांनी मनसेचे राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली आहे. “दोन भाऊ आम्हाला एकत्र नको आहेत का? त्यांनी एकत्र यावं. संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येण्याने काय होणार आहे. आज त्यांच्याकडे काय आहे?” अशी जोरदार टोलेबाजी नारायण राणे यांनी केली. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) फक्त 20 आमदार आहेत. पुढच्यावेळी पाचही आमदार नसतील, असा हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.
वैभव नाईकांच्या शिंदे गटातील प्रवेशावर राणे काय म्हणाले?
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक हे शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. नारायण राणे यांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. “उदय सामंत हे माझे सल्लागार नाहीत. हे माझं उत्तर आहे. मी परवानगी दिल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक मला घ्या म्हणत बाहेर बसलेले असायचे. समोरून ते निष्ठावान शिवसैनिक असा बोर्ड लावतात. मला राजकारणात 59 वर्षे झालीत. वैभव नाईक हे माझ्याबद्दल काहीही बोलतात. त्यांची माझ्याबद्दल बोलण्याची लायकी नाही. मी त्यांच्याबद्दल अजूनही वाईट विचार केलेला नाही,” असं स्पष्ट मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.