येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीची अटक

| Updated on: Mar 08, 2021 | 1:32 PM

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसलेंसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत (Anil Bhosale ED arrest)

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीची अटक
Anil Bhosale
Follow us on

मुंबई : शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (NCP MLC Anil Bhosale) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना तुरुंगात पाठवले आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. भोसलेंसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (NCP MLC Anil Bhosale ED arrest Shivaji Bhosle Co-operative Bank Pune Fraud Case)

कोणाकोणाला अटक

ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने शिवाजी भोसले सहकारी बँकेतील फसवणुकीसंदर्भात कारवाई केली. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना 25 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर या घोटाळ्याबाबत ईडीने गुन्हा दाखल केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कोर्टातून भोसले यांचा ताबा घेण्यासाठी ऑर्डर काढली.

काय आहे प्रकरण?

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. (NCP MLC Anil Bhosale ED arrest Shivaji Bhosle Co-operative Bank Pune Fraud Case)

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

काकडे-भोसले व्याही

धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव( भोसले बँकेचे कर्ज आहे. धनंजय मुंडे यांनी 1 कोटी 43 लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे. संजय काकडे हे राज्यसभेवरील भाजपचे खासदार आहेत. काकडे आणि भोसले एकमेकांचे व्याही आहेत. काकडेंचे दुसरे व्याहीसुद्धा राजकीय क्षेत्रातील आहेत. संजय काकडे यांची कन्या कोमल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सून आहे. काकडे-देशमुख कुटुंबाच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

संबंधित बातम्या : 

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

300 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

(NCP MLC Anil Bhosale ED arrest Shivaji Bhosle Co-operative Bank Pune Fraud Case)