सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक, हॅकरची मागणी काय?

"माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक, हॅकरची मागणी काय?
खासदार सुप्रिया सुळे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2024 | 10:05 AM

Supriya Sule Phone Hacker Demand : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची मागणी केली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन काल दुपारी 1 च्या सुमारास एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे सांगितले. “अत्यंत महत्वाचे – माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करु नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

पोलिसांकडून तपास सुरु

सुप्रिया सुळे यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता सुप्रिया सुळे यांनी यांचा मोबाईल हॅक झाल्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून हॅकरने 400 डॉलरची मागणी केली आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पुणे पोलिसांनी याबद्दलची तक्रार नोंद करत तपास करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळेंचा मोबाईल कसा हॅक झाला, तो कोणी आणि का हॅक केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये केलेल्या भाषणादरम्यान त्यांचा फोन नेमका कसा हॅक झाला, याबद्दल सांगितले होते. “मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण माझा फोन हॅक झाला. माझा फोन माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या हे लक्षात आले. या ठिकाणी आल्यावर माझं व्हॉट्सॲप सुरुच होत नव्हतं. मी जयंत पाटील यांना नमस्कार मेसेज करा असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरुन नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“मी कोणावरही आरोप केलेले नाहीत”

“मी पुन्हा दोन, तीन जणांना माझ्या फोनवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनाही समोरुन मेसेज आला. माझा फोन बंद आहे. मी सिमकार्ड काढलं आहे. पण तरीही जे कोणी मला मेसेज करतात, त्यांच्याशी कोण गप्पा मारतंय, याची मला कल्पना नाही. माझा फोन हॅक झाल्यानंतर मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मी कोणावरही आरोप केलेले नाहीत. माझा फोन कोणी हॅक केला मला माहिती नाही. यांच्याशी कोण गप्पा मारतंय हे देखील मला माहिती नाही”, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले.