
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानं राज्यभरात शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला त्यांची औकात दाखवून देऊ असं म्हणत या वादाला फोडणी दिलीय. निलेश राणे यांनी एक ट्विट करत शिवसेनेच्या बॅनरबाजीला आणि हात छाटण्याच्या धमक्यांनी फरक पडत नाही असंही म्हटलंय. एकूणच नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चढलाय.
निलेश राणे म्हणाले, “कुठेतरी बॅनर लावा आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो, तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.”
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.
माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.