शिवसेनेने वात पेटवली, नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची मालिका, चिपळूणमध्ये रंगणार हायव्होल्टेज ड्रामा?
Shivsena vs Narayan Rane | नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मुख्यत्वेकरुन मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे.

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने चांगलाच इंगा दाखवायला सुरुवात केली आहे. नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी अनुद्गार काढले होते. त्यानंतर राज्यभरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवर नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यातही शिवसेना आमदार अंबादास दानवे नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यातील आणखी काही शहरांमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन शिवसैनिकांकडून त्यांची कोंडी केली जाऊ शकते.
नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मुख्यत्वेकरुन मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणेंना अटक करण्याचे निर्देश, पोलीस पथक चिपळूणच्या दिशेने रवाना
शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. एवढेच नव्हे तर नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. हे पथक दुपारच्या सुमारास चिपळूणमध्ये दाखल होईल. त्यावेळी जन आशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने भाजपचे अनेक कार्यकर्ते नारायण राणे यांच्यासोबत असतील. राणे समर्थकांनी आत्तापासूनच आमच्या नेत्याला अटक करु देणार नाही, असे सांगत विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता चिपळूणमध्ये येत्या काही तासांमध्ये हायव्होल्टेड ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टीका करणाऱ्या नारायण राणेंवर गुन्हा दाखल
Video : ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली
मुख्यमंत्र्यांबद्दल राणे म्हणाले, मी असतो तर कानाखाली चढवली असती, आता शिवसेनेचं जशास तसं उत्तर
