शिखर बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास नकार

| Updated on: Sep 02, 2019 | 1:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. राज्य सहकारी को ऑप बँक घोटाळाप्रकरणी (MAHARASHTRA STATE CO BANK SCAM) गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

शिखर बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास नकार
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. राज्य सहकारी को ऑप बँक घोटाळाप्रकरणी (MAHARASHTRA STATE CO BANK SCAM) गुन्ह्याचा तपास रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  दुसरीकडे न्यायालयाने पोलिसांनाही याप्रकरणाची योग्य चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने नुकतंच अजित पवारांसह 70 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र गुन्हा रद्द करण्यासाठी अजित पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

सहकारी बँकेतील 25 हजार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार (NCP Ajit pawar) यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

काय आहे प्रकरण?

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.

1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेत संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूतगिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यावधींची कर्ज दिली. या संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अशा काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या तत्कालिन संचालकांनी आपल्या काळात सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांना कोट्यावधींची कर्ज दिली. पण या कर्जांची परतफेड न झाल्याने बँकेला प्रचंड तोटा झाला.

संबधित बातम्या 

शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत, जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव   

EXCLUSIVE : अजित पवार बैठकीला उपस्थित होते की नव्हते? शिखर बँक घोटाळ्याची कागदपत्रं टीव्ही 9 च्या हाती