OBC विरोधात ठाकरे सरकारचं षडयंत्र, बावनकुळेंचा हल्ला, निवडणुका होऊ देणार नाही, शेंडगेंचा एल्गार

| Updated on: Jun 23, 2021 | 10:17 AM

राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

OBC विरोधात ठाकरे सरकारचं षडयंत्र, बावनकुळेंचा हल्ला, निवडणुका होऊ देणार नाही, शेंडगेंचा एल्गार
Chandrashekhar Bawankule_Prakash Shendge
Follow us on

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा (ZP Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द (OBC reservation) केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आता ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी घेतला आहे. तर या सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु आहे, असं टीकास्त्र भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडलंय. (OBC leader Prakash Shendge and Chandrashekhar Bawankule opposes Maharashtra five zp and 33 panchayat samiti by election)

राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र आता ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

प्रकाश शेंडगे यांचा एल्गार

निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्याने, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी एल्गार पुकारला आहे. निवडणुकीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती द्यावी अन्यथा ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने काल जाहीर केला, हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. या निर्णयाचा ओबीसी समाज निषेध करतो. कोरोनामुळे या निर्णयाला स्थगिती दिली होती पण आता हा निर्णय लागू केला, विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन देऊनही हा निर्णय आला हे धक्कादायक आहे, असं प्रकाश शेंडगेंनी सांगितलं.

पंढरपूरच्या दिंड्यांची परवानगी नाकारता मग निवडणुकांना परवानगी कशी देता, असा सवाल प्रकाश शेंडगेंनी विचारला आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका होऊ देणार नाही, जेलभरो आंदोलन करू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

इकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारची दोन महिने वाट पाहिली. त्यानंतर हा निर्णय घेतला. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निवडणुका न लावू देण्याचं सांगितलं होतं. राज्य सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात जावं आणि या निवडणुका रद्द कराव्या, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

या सरकारमध्ये ओबीसींविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं चालत नाही. निवडणूक लागल्याने ओबीसी समाजाचं मोठं नुकसान आहे. निवडणूक झाल्यास भाजप या जागांवर खुल्या वर्गातून ओबीसी उमेदवार देईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राज्य सरकारविरोधात भाजपकडून 26 तारखेला 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार बावनकुळेंनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही, फक्त आपला अजेंडा राबवतात. मला संजय राऊत ओळखत नाही तर काय झालं, राज्यातील 13 कोटी जनता ओळखते, असा टोमणा बावनकुळेंनी लगावला.

जिल्हा परिषद-पं. समिती पोटनिवडणूक 

सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या 

सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय, पंकजा मुंडे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा