PM Narendra Modi | देहूतल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती!

| Updated on: Jun 14, 2022 | 10:01 AM

पुण्यातील कार्यक्रमातील मंचावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच वेळी हजर राहणार नाहीत, मात्र मुंबई येथील कार्यक्रमात हे दोघंही एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एक वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

PM Narendra Modi | देहूतल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती!
Follow us on

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहूतील संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj Temple) शिळा मंदिराचे लोकर्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुण्यातील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. याऐवजी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार या कार्यक्रमात हजर असतील. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमातील मंचावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच वेळी हजर राहणार नाहीत, मात्र मुंबई येथील कार्यक्रमात हे दोघंही एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एक वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुपारी 2 वाजता मुख्य कार्यक्रम

दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर पावणे दोन वाजेच्या सुमारास देहू येथील हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल. दुपारी दोन वाजता देहू येथील संत तुकाराम मंदिराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रदानांच्या हस्ते केलं जाईल. तत्पूर्वी श्री संत तुकाराम महाराज मंदिराबाहेर वारकऱ्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत केलं जाईल. मंदिरात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन, ध्वजपूजन, श्रीराम दर्शन, महादेव दर्शन घेतील. मुख्य कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा केली जाईल. त्यानंतर मंदिर कोनशीला अनावरण, अभंग गाथा दर्शन घेतले जाईल. त्यानंतर सभास्थळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल आणि पुण्यातील कार्यक्रमाचा समारोप होईल.

मुंबईत मोदी-ठाकरे एकाच मंचावर!

पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईत आगमन होणार आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतील. तेथे राजभवानतील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहतील. क्रांतिकारक गॅलरी हे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेले अशा प्रकारचे पहिलेच संग्रहालय आहे. त्यानंतर मुंबई समाचारच्या द्विशतक वर्षपूर्तीच्या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित असतील. बांद्रा येथील या जिओ वर्ल्ड सेंटर ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्रीदेखील उपस्थित असतील.

हे सुद्धा वाचा

याआधी ठाकरेंनी टाळलं होती भेट

याआधी एप्रिल महिन्यात लता मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी नरेंद्र मोदी होते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते मुंबईत आले होते. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याचं कारण सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवली होती. नंतर या कार्यक्रमाला जाणंच त्यांनी टाळलं होतं. आजच्या कार्यक्रमाला मात्र उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.