
बिहार : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनादेखील अटक करण्यात आली आहे. ते ही जेलमध्ये सजा भोगत आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या कालावधीतच या दोन्ही नेत्यांना अटक झाल्यामुळे पक्षात चलबिचल झाली होती. मात्र, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आहे. या दोघीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. मात्र बिहारमध्ये जेलमध्ये असलेल्या चार नेत्यांनी आपल्या पत्नीनाच उमेदवारीच्या रिंगणात उतरविले आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागांसाठी मतदान होणार आहे. बिहारच्या राजकारणात मसल पॉवर आणि बाहुबली यांचा भर वर्षानुवर्षे दिसत आहे. ही मालिका याही वेळच्या निवडणुकीत दिसणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत चार बलाढ्य नेते असे आहेत की ज्यांची पार्श्वभूमी असल्यामुळे ते स्वतः निवडणूक लढवू शकणार नाही. मात्र, संसदेची पायरी चढण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे.
आनंद मोहन, अवधेश मंडल, रमेश सिंह कुशवाह, अशोक महतो अशी या चार नेत्यांची नावे आहेत. या नेत्यांनी त्यांच्या पत्नीला पक्षाकडून तिकीट मिळवून दिले आहे. तिच्या माध्यमातून लोकसभेत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या नेत्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी प्रत्यक्षात त्या स्वत:च निवडणूक लढवत आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न त्यांचे पती करत आहेत.
ANAND MOHAN AND LAVLI ANAND
माजी खासदार आनंद मोहन यांनी पत्नी लवली आनंद यांना जनता दल युनायटेड पक्षाने शिवहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आनंद मोहन हे दोन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत. 1994 मध्ये आनंद मोहन यांना गोपालगंज दलित जिल्हा दंडाधिकारी यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक झाली. 16 वर्ष तुरुंगात काढल्यानंतर आनंद मोहन यांची गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुटका झाली. आनंद मोहन स्वत: निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांनी पत्नी लवली आनंद यांना जनता दल युनायटेड पक्षाचे तिकीट मिळवून दिले आहे. 2019 मध्ये लवली आनंद यांनी आरजेडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यांचा पराभव झाला होता.
AVDHESH MANDAL AND BIMA BHARTI
विमा भारती या कुख्यात गुन्हेगार अवधेश मंडलच्या पत्नी आहेत. पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून विमा भारती या आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. अवधेश मंडल याच्यावर खून आणि अपहरणाचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. अवधेश मंडल यांच्या पत्नी विमा भारती या पाच वेळा आमदार होत्या. आमदार असताना त्यांनी जनता दल युनायटेडचा राजीनामा देऊन राजदमध्ये प्रवेश केला. यावेळी त्या पूर्णिया येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
Ramesh Singh Kushwaha AND vijayalakshmi Devi Kushwaha
जनता दल युनायटेडच्या तिकीटावर सिवानमधून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या विजयालक्ष्मी देवी या बाहुबली नेते रमेश सिंह कुशवाह यांच्या पत्नी आहेत. रमेश सिंह कुशवाह हे शिवाजी दुबे हत्याकांडातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना तुरुंगवास भोगला आहे. रमेशसिंह कुशवाह हे माजी आमदार आहेत. या मतदारसंघाच्या जनता दल युनायटेडच्या विद्यमान खासदार कविता सिंह आहेत. पण, नितीश कुमार यांनी कविता यांची तिकीट रद्द करून त्यांच्या जागी विजयालक्ष्मी देवी यांना उमेदवारी दिली आहे.
ashok mehto and anita kumari
अनिता कुमारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुंगेरमधून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. अनिता कुमारी या नवाडाचा बलाढ्य आणि गुन्हेगार नेता अशोक महतो यांच्या पत्नी आहेत. 2001 च्या नवादा जेल ब्रेक प्रकरणात अशोक महतो 17 वर्षे तुरुंगात होते आणि गेल्या वर्षीच त्यांची सुटका झाली आहे. अशोक महतो स्वत: निवडणूक लढवू शकत नाहीत याच कारणामुळे त्यांनी पत्नी अनिता कुमारी यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले आहे. अनिता देवी यांची लढत जनता दल युनायटेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग यांच्याशी होणार आहे.