Supriya Sule : राज्यात सत्तासंघर्ष, पण मामांना केलेल्या विकास कामांची पावती मिळणारच, सुप्रिया सुळेंनी काय सांगितली भविष्यवाणी?

| Updated on: Sep 28, 2022 | 2:22 PM

इंदापूर मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आता भाजपाने या मतदार संघातही दौरे केले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दौरा केला असून गेल्या अडीच वर्षात झालेल्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडला आहे.

Supriya Sule : राज्यात सत्तासंघर्ष, पण मामांना केलेल्या विकास कामांची पावती मिळणारच, सुप्रिया सुळेंनी काय सांगितली भविष्यवाणी?
खा. सुप्रिया सुळे
Follow us on

राहुल ढवळे टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी इंदापूर : राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. असे असतानाच आपआपले बालेकिल्ले शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच भाजप पक्षाकडून (BJP Party) बारामतीसह इतर लोकसभा मतदार संघात पक्ष संघटन केले जात आहे. असे असले तरी इंदापूर विधान मतदार संघावर (Indapur Constituency) त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. गेल्या अडीच वर्षाच्या काळात आ. दत्तात्रय भरणे यांनी पुढील 10 वर्षाचा विकास केला आहे. त्यामुळे येथून पुढे 10 वर्ष ते या मतदार संघाचे नेतृत्व करतील अशी गॅरंटी खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

भाजपाकडून मध्यंतरी बारामतीसह इतर मतदार संघात पक्ष संघटनेवर काम करण्यात आले आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे ह्या इंदापूर दौऱ्यावर होत्या. इंदापूरसह पुणे जिल्हा बारामतीचा बालेकिल्ला असला तरी स्थानिक पातळीवर संघटात्मक बदल केले जात आहेत.

गेल्या अडीच वर्षात दत्तात्रय भरणे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठे परिश्रम घेतले आहे. वेळप्रसंगी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आडवेही घेतले पण कामे सुटू दिली नाहीत. त्यामुळे वाड्या-तांड्याचे चित्र बदलले असल्याचे सुळे यांनी सांगितले.

सत्तांतर झाले असले तरी त्याचा परिणाम इंदापूर मतदार संघावर होणार नाही. यापूर्वीही सत्ता नसताना येथील जनता पवार कुटुंबियांच्या आणि भरणे मामाच्या पाठीशी उभी असल्याचे महाराष्ट्राने पाहिले असल्याचेही सुळे म्हणाल्या.

मतदार संघात कमी कालावधीत अधिक विकास झाला आहे. शहरांपासून ते वाड्या-वस्त्यावर मुलभूत सोई-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे 10 वर्ष तरी भरणे मामा हेच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतील असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी मतदार संघात झालेल्या विकास कामांची तर यादी सांगितलीच पण आगामी विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असतील असाच दाखला त्यांनी दिला आहे. त्यामुळे भरणे मामांच्या विरोधात नेमके कोण हे देखील पहावे लागणार आहे.