मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवायचा आहे, त्यामुळेच सरकारकडून वेळकाढूपणा; प्रवीण दरेकरांची टीका

| Updated on: Nov 25, 2020 | 7:51 PM

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना आरक्षणाचा मुद्दा असाच तेवत ठेवायचा आहे," अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवायचा आहे, त्यामुळेच सरकारकडून वेळकाढूपणा; प्रवीण दरेकरांची टीका
Follow us on

नागपूर : “राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. राज्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा असाच तेवत ठेवायचा आहे,” अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकारवर केली. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी ते नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. (Pravin Darekar criticizes state government on Maratha Reservation)

“भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने नेहमीच उभी आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना हा वाद असाच तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे ते वेळ काढत आहेत,” अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली. तसेच, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तांत्रिक बाबिंमध्ये आडकला होता. त्यामुळे आमच्या सरकारने 1000 कोटी रुपयांचे पॅकेज दिलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाविकास आघाडीत तारतम्य नाही

प्रविण दरेकर यांनी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. “पाच वर्षे भाजपची सत्ता असताना फडणवीस सरकारने राज्यात मोठा विकास केला. त्यात विदर्भाचाही मोठा विकास झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांनीही विदर्भाचा विकास केला. राज्यात अनैसर्गिकरित्या आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठलाही विकास केलेला नाही. महिला सुरक्षेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हे सगळे प्रश्न अजूनही आहेत. महाविकास आघाडीत तारतम्य नाही. सत्तेत काँग्रेसला कोणी मानत नाही. सरकारमध्ये कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही,” असे दरेकर म्हणाले. तसेच, वीजबिलात 100 युनिटची माफी देऊ असं सांगूनसुद्धा त्यावर निर्णय घेतला नाही, असे म्हणत त्यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला डिवचलं.

युवकांना उद्योजक म्हणून उभं करु

“सध्याचे सरकार आणि फडणवीस सरकार यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच भाजपचा आहे. राज्यातील निवडणुकीवरून जनता भाजपसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागपूरची जागा भाजप जिंकणार यात काही शंका नाही. पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत. ते आम्ही पूर्ण करू. युवकांना उद्योजक म्हणून उभं करण्याचं काम करु. त्यातून रोजगारसुद्धा निर्माण होतील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Pravin Darekar criticizes state government on Maratha Reservation)

संबंधित बातम्या :

राज्य सरकारची नियत चांगली नाही, त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, विनायक मेटेंचा घणाघात

ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा घात, कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय