शाह दुय्यम फलंदाज, मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Oct 14, 2019 | 10:15 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं.

शाह दुय्यम फलंदाज, मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

सातारा : अमित शाह दुय्यम फलंदाज असून मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan on Udayanraje) यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं. कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांविरोधात भाजपने विलासराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांना तिकीट दिलं आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात महाआघाडीतर्फे श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. या दोन्ही लक्षवेधी लढती चुरशीच्या होणार आहेत.

महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर न बोलता कलम 370 वर बोलणाऱ्या अमित शाहांनी काश्मीरबाबत अभ्यास करावा, असा सल्लाही पृथ्वीराज’बाबां’नी शाहांना (Prithviraj Chavan on Udayanraje) दिला. पंडित नेहरु होते म्हणून काश्मीर भारताचा भाग असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा चव्हाणांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.