MNS Jagar Padyatra : मुंबई-गोवा महामार्गासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा

| Updated on: Aug 27, 2023 | 8:48 AM

MNS Jagar Padyatra For Mumbai Goa Highway : खडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर; अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा. आठ टप्प्यात ही पदयात्रा असेल. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या पदयात्रेचा समारोप होईल.

MNS Jagar Padyatra : मुंबई-गोवा महामार्गासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा
Follow us on

रायगड | 27 ऑगस्ट 2023 : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत सहभाग झाली आहेत. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे. तर या पदयात्रेच्या समारोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अमित ठाकरे यांनी जागर यात्रा सुरू होण्यापुर्वी शिव मंदिरात जात दर्शन घेतलं. त्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली.

अमित ठाकरे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. वाशी टोल नाक्यावर फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. गजानन काळे आणि नवी मुंबईतील इतर मनसैनिकांनी अमित ठाकरेंचं स्वागत केलं.

अमित ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या पदयात्रेविषयी माहिती दिली. गेला 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं हे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय. आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत, असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

 

तरणखोप ते कासू कोकण जागर पदयात्रेला सुरुवात झाली आहे आहे.मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जागर पदयात्रेवर प्रतिक्रिया दिली आहे. खऱ्या अर्थाने जागर यात्रेला सुरुवात झालेली आहे. मुंबई महामार्ग लवकरात लवकर व्हावा, हीच आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे काम लवकरच होणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. एका लेनचं काम गणेशोत्सवापूर्वी होणार आहे. तर दुसऱ्या लेनच काम डिसेंबरपर्यंत होणार आहे, असं रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत. त्याला बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. या महामार्गाचं काम झालं तर त्यांना माझ्या शुभेच्छा! राज ठाकरे या पदयात्रेचा समारोप करणार आहेत. आजच्या या पदयात्रेनंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

तर रत्नागिरीतील चिपळूणमध्येही मनसेची पदयात्रा निघणार आहे. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातून ही पदयात्रा सुरु होईल. मनसैनिक एकत्र येत सरकारला प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.