निवडणुकीची घोषणा होताच अजितदादांचा धक्कादायक आदेश, महायुतीत खळबळ!

अजित पवार यांनी मोठा आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता महायुतीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीची घोषणा होताच अजितदादांचा धक्कादायक आदेश, महायुतीत खळबळ!
AJIT PAWAR AND EKNATH SHINDE
| Updated on: Nov 05, 2025 | 4:56 PM

Raigad Local Body Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत येत्या दोन डिसेंबर रोज 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागेल. दरम्यान, आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्यांची शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. असे असतानाच आता अजित पवार यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर आता रायगडमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडतंय?

रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आज (5 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको असा सूर सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आळवला. जिल्ह्यात भाजपासोबत युती करूया पण शिवसेनेसोबत नको, अशी भूमिका या बैठकीत स्थानिक नेत्यांनी मांडली. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांचा पवित्रा पाहता अजित पवार यांनीदेखील मोठा निर्णय घेतला आहे. कोणाशी युती करायची या संदर्भात स्थानिक स्तरावर निर्ण घ्या, असे आदेश अजित पवार यांनी या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भरत गोगावले विरुद्ध सुनिल तटकरे

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनलि तटकरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. सभा, बैठकांमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. स्थानिक स्वाराज्य संस्थांची निवडणूक या दोन्ही नेत्यांना वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून तटकरे आणि गोगावले हे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. गोगावले यांनी तटकरे यांच्यापुढे युतीचा एक प्रस्ताव ठेवला होता. ज्याचे जेवढे आमदार त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे जागावाटप, असा हा फॉर्म्यूला होता. या फॉर्म्यूल्याची तटकरे यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता आम्ही मुक्त झालो आहोत, असे सांगत शिवसेनेशी युती होणार नाही, असेच संकेत दिले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनीही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असा आदेश दिल्याने नेमकं काय होणार? राष्ट्रवादी भाजपाशी युती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.