तावडेंना महाराजांचा शाप लागला, म्हणून ते घरी बसलेत : राज ठाकरे

| Updated on: Oct 17, 2019 | 10:03 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे वगळले. याच कारणामुळे महाराजांनी तावडेंना शाप दिला असावा आणि त्यांना घरी बसवलं असावं बहुतेक," अशी टीका राज ठाकरेंनी तावडेंवर (Raj Thackeray Mumbai) केली.

तावडेंना महाराजांचा शाप लागला, म्हणून ते घरी बसलेत : राज ठाकरे
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज शिवडी आणि प्रभादेवी अशा दोन ठिकाणी सभा पार पडल्या. यावेळी राज ठाकरेंनी भाजप नेते विनोद तावडेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. “महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय बोर्ड सुरु केलं. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे वगळले. याच कारणामुळे महाराजांनी तावडेंना शाप दिला असावा आणि त्यांना घरी बसवलं असावं,” अशी टीका राज ठाकरेंनी तावडेंवर (Raj Thackeray Mumbai) केली.

“महाराष्ट्रावर हजारो वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. ते आपल्याला अंधारातून बाहेर काढतात. म्हणूनच शिवाजी महाराज की जय असे म्हटल्यावर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना महाराष्ट्रात सरकारने आंतरराष्ट्रीय बोर्ड सुरु केला. महाराष्ट्र सरकारच्या या आंतरराष्ट्रीय बोर्डातून शिवरायांचे धडेच काढून टाकले. याच कारणामुळे महाराजांनी तावडेंना शाप दिला असावा आणि ते घरी बसले असावे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“मी तुम्हाला ठामपणे सांगतो, मेट्रो ही मुंबईतील मराठी माणसाचं जगणं कठीण करणार. यामुळे मुंबईतील जागांच्या किमती वाढणार. तुम्ही ही एके दिवशी सरकत सरकत उजबेगिस्तानला जालं”, असेही राज ठाकरे म्हणाले.

“माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी मी काँग्रेस म्हणून कधीच पाहत नाही. त्यांनी मी एक विद्वान माणूस म्हणून बघतो.” असेही राज ठाकरे म्हणाले.

“मेट्रो कारशेडसाठी बीपीटीची जागा आहे. पण तिथे ते कारशेड करणार नहाी. ती त्यांना विकासकांना द्यायची आहे. मेट्रोसाठी आरेतील झाडं तोडली आणि आता उद्धव ठाकरे सांगतात की आरेला जंगल घोषित करु. गवत लावण्यापासून सुरुवात करणार का?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला.

“शिवसेना सांगते हिच ती वेळ… कसली ही ती वेळ? मग पाच वर्ष काय वेळ नव्हता काय?” असा टोलाही राज ठाकरेंनी (Raj Thackeray Mumbai) शिवसेनेला लगावला.

“या सरकारने जाहीरनाम्यात टोल मुक्त रस्ते देऊ अस म्हटलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर मुंबईतील खड्डे बुजवले नाही. पालिका दरवर्षी फक्त त्याच कंत्राटदाराला रस्त्यांचे खड्डे बुझवण्यासाठी टेंडर काढलं जातात. पालिकेचे अनेक आरक्षित भूखंड विकासकांच्या घश्यात घातलं जात आहेत. दादर , परळ , लालबाग , शिवाजी पार्क मधील भाषा बदलायला लागली आहे”, असेही राज ठाकरे म्हणाले.

“देशातील सर्वाधिक इन्कम टॅक्स मुंबईतून जातो. अप्रत्यक्ष कर देखील सगळ्यात जास्त मुंबईतून देशाला जातो. तरीही मुंबई शहराला चांगले रस्ते मिळत नाहीत. रस्ते टोलमुक्त नाहीत.  शिवसेना भाजपने 2014 च्या जाहीरनाम्यात आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू पण पुढे काहीच घडलं नाही,” अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.