भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? राज ठाकरेंचा सवाल

| Updated on: Feb 06, 2021 | 3:30 PM

भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? राज ठाकरेंचा सवाल
Follow us on

औरंगाबाद : शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. (Raj Thackeray criticizes BJP-Shiv Sena)

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण

भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना त्यांनी औरंगाबादचं नाव बदललं नाही. तेव्हा यांना कुणी रोखलं होतं? आज कसलं राजकारण करत आहात? असा प्रश्न विचारतानाच राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना अनेक शहरांची नावं बदलली, दिल्लीच्या रस्त्यांनी नावं बदलली गेली. मग औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा आणि जनतेची फसवणूक करायची, हेच चालत आलं आहे. पण संभाजीनगरची जनता हुशार आहे. ती योग्य निर्णय घेईल आणि शिवसेना-भाजपचा योग्य समाचार घेईल, असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय.

मनसैनिकांचा खैरेंना घेराव

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मनसे कार्यक्रर्त्यांनी गुरुवारी घेराव घातला. खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचं कळल्यानंतर शेकडो मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले. मनसे सैनिकांनी खैरे यांची गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरू करण्यात आली.

मनसे कार्यकर्त्यांनी गाडी अडवल्यानंतर खैरे यांना गाडीच्या बाहेर यावं लागलं. यावेळी खैरे यांनी मनसे सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक मनसे सैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत औरंगाबादचं नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला. त्याचवेळी मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खैरेंना गप्प उभं राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

संबंधित बातम्या :

मनसेचा औरंगाबादेत राडा, चंद्रकांत खैरेंची गाडी अडवली; घेराव घालून विचारला जाब

हिंदुत्व सांगून चालत नाही वागण्यातून दिसावं, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला

Raj Thackeray criticizes BJP-Shiv Sena