Raj Thackeray: मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब, तुम्ही जनतेच्या मनातील…राज ठाकरेंच्या नावाने कल्याणमध्ये बॅनर, खास संदेशाची एकच चर्चा!
Raj Thackeray: काल डोंबिवलीतील प्रगती कॉलेजमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता कल्याणमध्ये लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका, पत्रकार परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून, त्यांना ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ म्हणून संबोधण्यात आले आहे.
काल डोंबिवलीतील प्रगती कॉलेजमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक कामकाज, आगामी कार्यक्रम आणि स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर आज कल्याणमध्ये राज ठाकरेंची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्ता मेळावा होणार असून, या मेळाव्यापूर्वी कल्याण पश्चिमेत मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरवर ‘मराठी हृदयसम्राट, तुम्ही राजा होता, तुम्ही राजा आहात अन् राजाच राहणार’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री सन्माननीय राजसाहेब ठाकरे’ असा उल्लेख करत ऐतिहासिक कल्याण नगरीत त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. या बॅनरबाजीमुळे परिसरात राज ठाकरेंच्या दौऱ्याची चर्चा रंगली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत असून, राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे स्थानिक स्तरावर संघटनेला नवीन जोर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकांमुळे संघटनात्मक बळकटीकरणाला चालना मिळेल, असे मानले जात आहे. बॅनरबाजी आणि स्वागताच्या तयारीमुळे राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.