
Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याच भेटीचा एक खास फोटोही समोर आला आहे. हा फोटो पाहून तर अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोसोबत राज ठाकरे यांनी दोन ओळींचे कॅप्शन दिले आहे. याच कॅप्शनचा आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या या फोटोचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राज ठाकरे यांनी फोटोसोबतच्या कॅप्शनला उद्धव ठाकरे यांना मोठे बंधू असे म्हटले आहे. तसेच त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे ही भेट म्हणजे आगामी युतीची पायाभरणी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री या नावाला विशेष स्थान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच घरातून राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आजही मातोश्री या निवासस्थानाचा अनेकदा उल्लेख होतो. कधीकाळी राज ठाकरे हेदेखील शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरेंचे मार्गदर्शन घेण्यासाठी मातोश्री या बंगल्यावर जायचे. याच घरासोबत राज ठाकरे यांच्या लहाणपणापासूनच्या आठवणी आहेत. त्यामुळे त्यांनी ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या’ असं म्हटलंय.
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/sFp2Hduubx— Raj Thackeray (@RajThackeray) July 27, 2025
राज ठाकरे यांनी एक फोटो टाकून उद्धव ठाकरे यांच्यासोबतचं भावाचं नातं, शिवसेना पक्ष आणि या पक्षाशी उद्धव ठाकरे यांचे असलेला संबंध तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रतीची असलेली श्रद्धा या तिन्ही बाबी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय बदल घडून येणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.