Rajiv Awale | दोन दिवसांपूर्वी प्रवेश आणि त्याच राष्ट्रवादीत का विरोध?

| Updated on: Dec 18, 2020 | 12:23 PM

हातकणंगलेतील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. Rajiv Awale NCP Hatkanangale

Rajiv Awale | दोन दिवसांपूर्वी प्रवेश आणि त्याच राष्ट्रवादीत का विरोध?
Follow us on

इचलकरंजी : राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधून दोन दिवस उलटत नाहीत, तोच माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Awale) यांना विरोध होताना दिसत आहे. कोल्हापुरात हातकणंगले (Kolhapur Hatkanangale) तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राजीव आवळे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळी उडालेल्या ठिणग्यांचं उत्तर विरोधाने दिलं जात आहे. (Rajiv Awale opposed by NCP Youth Congress Hatkanangale)

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता.

राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आडकाठी

हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष लखन बेनाडी यांनी आवळेंना विरोध केला आहे. राजू आवळे यांनी विधानसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला होता. याच अनुषंगाने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशानंतर आडकाठी केली आहे.

“अन्यथा दुसरा विचार करावा लागेल”

पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, नाहीतर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या लखन बेनाडे यांच्या वतीने देण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये लखन बेनाडे यांची मोठी ताकद आहे. त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून पडत्या काळामध्ये राष्ट्रवादीला उभारी दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी पूर्ण ताकदीनिशी काम करेन. पक्षसंघटना वाढीसाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया आवळे यांनी दिली होती.

कोण आहेत राजीव आवळे?

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं 25 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला राजीव आवळेंनी सुरुंग लावला होता. (Rajiv Awale opposed by NCP Youth Congress Hatkanangale)

राजकीय पुनर्वसनाकडे लक्ष

राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. हातकणंगले मतदारसंघावर आवळेंचं वर्चस्व होतं. मात्र  काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा गड खालसा केला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आवळे यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत. मात्र हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची ही नांदी मानली जात आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, कोल्हापुरातील माजी आमदार ‘घड्याळ’ बांधणार

माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

(Rajiv Awale opposed by NCP Youth Congress Hatkanangale)