पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ‘आक्रोश मोर्चा’ची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, राजू शेट्टींचा हल्लाबोल

| Updated on: Aug 23, 2021 | 4:22 PM

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसतं. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केलीय.

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, राजू शेट्टींचा हल्लाबोल
राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसतं. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केलीय. तसंच पूर आला म्हणून सरकारी नोकरदारांचे पगार थांबले का? तुम्ही आम्हाला नाराज केलं, अपेक्षाभंग केला, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. (Farmers’ agitation at Kolhapur Collectorate led by Raju Shetty)

शेट्टींची जयंत पाटील, मुख्यमंत्र्यांवर टीका

कृष्णा, पंचगंगा नदीतील महापुराचं पाणी बोगद्यातून दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. अशा मोठ्या योजना आणून पैसे खाण्याचा हा उद्योग आहे. जयंत पाटील यांची ही योजना कधीच पूर्ण होणार नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी यावेळी केलीय. पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरु झाले असल्यानं फी कशी भरायची? असा सवाल यावेळी शेट्टींनी विचारलाय. शेतकऱ्यांना 2019 साली आलेल्या महापुराप्रमाणे मदत मिळायला हवी, अशी मागणीही यावेळी शेट्टींनी केलीय.

‘अलमट्टी धरण महापुराचं एक कारण’

महापुराचं एक कारण अलमट्टीही आहे. तज्ज्ञ कितीही नाही म्हणत असले तरी आम्ही सिद्ध करायला तयार आहोत. लोकांची फसवणूक करण्यापेक्षा आम्ही सांगतो त्या पद्धतीनं व्यवहारिक उपाय करा. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारलाय. तर दिल्लीत बसून सोयाबीन आयात करायचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना निम्मा तोटा झाला, असा आरोप शेट्टी यांनी केलाय.

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त आश्वासन देऊन गेले’

संपूर्ण पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचं विना अट संपूर्ण पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. त्यामुळे 23 ऑगस्टपर्यंत सरकारनं नुकसान भरपाईचं धोरण ठरवावं, अन्यथा पुढचा निर्णय मोर्चावेळी जाहीर करु, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.

इतर बातम्या :

कोरोना काळात राजेश टोपेंचं काम कौतुकास्पद, खासदार सुप्रिया सुळेंचं प्रशस्तीपत्र

आईने शिवणकाम करुन वाढवलं, मुलीने विनाचप्पल स्पर्धा गाजवल्या, शैली सिंहच्या मेहनतीला देशाचा सलाम

Farmers’ agitation at Kolhapur Collectorate led by Raju Shetty