Raju Shetty : ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त, राजू शेट्टींची मविआवर घणाघाती टीका

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ईडीच्या वादळात आख्खा वाडा उध्दवस्त झाल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetty : ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त, राजू शेट्टींची मविआवर घणाघाती टीका
| Updated on: Jun 30, 2022 | 8:00 AM

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यापालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात आले होते. आज त्यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता यावरून शेतकरी नेते राजू  शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यानो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला ! देवाच्या काठीला आवाज नसतो ‘!! असे ट्विट राजू शेट्टी यांनी या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

उद्धव ठाकरेंचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत हे जाहीर करताच मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसेच सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करायला सांगावे अशा मागणीचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने देखील बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री जनतेशी भावनिक संवाद साधला, व आपण राजीनामा देत असल्याचे घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

 

शिवसैनिकांना शांततेचे आवाहन

दरम्यान राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. आपण अडीच वर्षांमध्ये काय केले याचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. तसेच त्यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन देखील यावेळी केले. दरम्यान दुसरीकडे आज दहा वाजता एकनाथ शिंदे यांच्या गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही केवळ सत्तेसाठी बंड केला नसल्याचा दावा देखील यावेळी केसरक यांनी केला आहे.