राणेंचा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे : चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 31, 2019 | 6:04 PM

नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) म्हणाले.

राणेंचा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे : चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) त्यांच्या दोन मुलांसह भाजपात येणार असल्याची माहिती आहे. पण यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) यांनी, हा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे असल्याचं सांगत बोलण्यास नकार दिला. नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) म्हणाले.

पुण्यात चंद्रकांत पाटील गणेशोत्सव संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल असाच ते निर्णय घेतील. मात्र शिवसेनेची नारायण राणे यांच्याबाबत काही नाराजी असेल तर या संदर्भात मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांच्या ना हरकती नंतरच राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती होणार हे निश्चित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि ते राजे आहेत, ते आले तर अमित शाहांच्या उपस्थितीतच त्यांचा पक्ष प्रवेश होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाचा – या 10 दिग्गजांचा अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित?

राज्यात आमच्या युतीबाबत विश्वास निर्माण झालाय. अनेक आमदार-खासदारांचे काही तांत्रिक मुद्दे आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी आमदाराने खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. पक्ष प्रवेशासाठी मोठी रांग असल्याने एक तारखेनंतर ही पक्षप्रवेश सुरूच राहील, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

वाचा – भास्कर जाधवांचंही ठरलं, माजी प्रदेशाध्यक्षच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार

भाजपात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचं स्वागत आहे. आम्हाला पक्ष वाढवायचा असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. पक्षात राणे किंवा इतर कोणी आल्याने मला काही फरक पडत नाही, सगळे मित्र असून मला महत्वकांक्षा नाही, संघटनेने सांगितलेलं काम मी करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वाचा – नातेवाईक सोडून का चालले? प्रश्न विचारताच शरद पवार संतापले, माफीची मागणी

चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील गणेश उत्सवा संदर्भात बोलताना सलग सहा दिवस 12 वाजेपर्यंत देखावे पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती दिली. तर डॉल्बीला विरोध नसून डेसिबलला विरोध असल्याचं ते म्हणाले. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारा ते सहा वाजेपर्यंत वाद्य बंद राहतील आणि यासंदर्भात रात्रभर कोणाला परवानगी हवी असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असंही त्यांनी म्हटलंय.