Big Breaking : मध्यावधी निवडणुका कधीही, कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

| Updated on: Nov 05, 2022 | 3:38 PM

राज्यातील अनेक प्रकल्प पळवले. नंतर सव्वा दोनशे कोटीचे प्रकल्प राज्यासाठी जाहीर केले. त्यातील काही प्रकल्प राज्यातीलच आहेत. हे सर्व प्रकल्प हवेतील आहेत.

Big Breaking : मध्यावधी निवडणुका कधीही, कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश
मध्यावधी निवडणुका कधीही, कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्याच्या (maharashtra) राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका (mid term election) लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? याची जोरदार चर्चा रंगली आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात, असंही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितल्याचं समजतं.

दरम्यान, खासदार अरविंद सावंत यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या संकेताला दुजोरा दिला आहे. 2014 पूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. पण 2012 नंतर विधानसभेची निवडणूक लागली. तेव्हा हिमाचल प्रदेशची निवडणूक आधी झाली. नंतर गुजरातची झाली. मधल्या काळात बऱ्याच घोषणा झाल्या. घोषणा झाल्या आणि निवडणुका लागल्या. आताही तेच होण्याची शक्यता आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

राज्यातील अनेक प्रकल्प पळवले. नंतर सव्वा दोनशे कोटीचे प्रकल्प राज्यासाठी जाहीर केले. त्यातील काही प्रकल्प राज्यातीलच आहेत. हे सर्व प्रकल्प हवेतील आहेत. पण असे प्रकल्प जाहीर करतात तेव्हा निवडणुका लागण्याची संकेत असतात. अशी प्रलोभने दाखवायची आणि आम्ही हे केले, ते केले म्हणून सांगायचं ही पद्धत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मध्यावधीचे संकेत दिले आहेत, असं सांगतानाच मध्यावधी निवडणुकीशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आमदार मनिषा कायंदे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाचे महत्त्वाचे निरोप असतात ते मातोश्रीतून जात असतात. बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा असे संकेत देत असत. हे संकेत संपर्क प्रमुख मतदारसंघात देत असत. तसेच विधानसभा मतदारसंघातील छोट्यातील छोटी घडामोड पक्षप्रमुखांकडे पोहोचवली जाते. ती पद्धत गेल्या 50 वर्षापासून सुरू आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

शिवसैनिक 24 तास काम करत असतात. निवडणुका आल्यावरच आमच्या शाखा उघडतात असं नाही. काही लोकांच्या शाखा आणि टपऱ्या केवळ निवडणुका आल्यावरच उघडतात. आमचं तसं नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रसंगासाठी तयारच आहोत, असं सूचक विधानही कायंदे यांनी केलं.