
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार तथा खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा एक फोटो समोर आला असून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार आमची पुरोगामी विचारधारा आहे, असे सांगतात. मात्र त्यांच्या पत्नी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, आता अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे.
रोहित पवार आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रोहित पवारांनी सडकून टीका केली आहे. “जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं. तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हेदेखील त्यांनी आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारायला हवं. मला वाटतं की अजित पवार सत्तेत गेले आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर अजितदादांनी संघाचे विचार स्वीकारले नसतील. मात्र त्यांच्यावर कदाचित दबाव असावा. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, असा दबाव त्यांच्यावर टाकला जात असावा. असा फोटो बाहेर आला की हेसुद्धा आरएसएसचा विचार स्वीकारायला लागले आहेत, असा संदेश बाहेर जातो, असा हेतू असावा,” असे रोहित पवार म्हणाले.
तसेच, एका बाजूला आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, असे सांगितले जाते. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेतले जाते. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतले जाते. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही आरएसएसच्या बैठकीला जात असाल, तुमचे प्रतिनिधी आरएसएसच्या बैठकीला जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे, अशी थेट टीकाही रोहित पवारांनी केली. तसेच आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नको आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला आहे.
एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 21, 2025
तर संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच, कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, असे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.
आज मेरे आवास पर ‘राष्ट्र सेविका समिति’ महिला शाखा का आयोजन हुआ।हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिन्दू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे।
हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे।
महिलाओं की जागरूकता और… pic.twitter.com/Cu5PecbELP— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 20, 2025
दरम्यान, भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी त्याच्या ट्विटर खात्यावर काही फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो अपलोड करताना माझ्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या महिला शाखेचे आयोजन झाले. आम्ही सर्वजणी सनातन मूल्य, हिंदू संस्कृती, राष्ट्रीय जेतना कायम ठेवण्याचा प्रयत्न करू, असे कंगना रनौत यांनी म्हटलंय. कंगना यांनी ट्विट केलेल्या याच फोटोंमध्ये सुनेत्रा पवार या उभे राहून भाषण करताना दिसत आहेत. याच फोटोमुळे आता वाद निर्माण झाला आहे.