Rohit Pawar : 2024 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल? रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, आता स्पष्टीकरण

| Updated on: Jul 24, 2022 | 6:23 PM

रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ऐकायला मिळतेय. अशावेळी रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. काही लोकांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Rohit Pawar : 2024 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल? रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, आता स्पष्टीकरण
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: Twitter
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एका वक्तव्यानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. 2024 नंतर राजकारणातील समीकरणं बदलणार आहेत, नव्या पिढीला निर्णय घ्यावे लागणार आहेत. इतकंच नाही तर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला असेलच, असं वक्तव्य रोहित पवार यांनी जुन्नरमध्ये केलं. रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ऐकायला मिळतेय. अशावेळी रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. काही लोकांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

जुन्नरमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले की, 2024 नंतरची वेळ युवकांची आहे. ती वेळ आमची आहे. 2024 ला आपल्याला सर्वांसोबत राहून आपल्या विचारांचं सरकार कसं येईल? यासाठी काम करावं लागणार आहे. जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा निर्णयदेखील आपल्यालाच घ्यावे लागतील. त्या निर्णयांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला असेलच. पण कोणतं काम करायचं, कसं करायचं ? आणि कुणाकडे कोणतं पद द्यायचं? याचा निर्णय नवीन पिढी घेईल’, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मात्र, आता त्यावर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

‘येणारा काळ हा युवांचा असेल असं म्हणालो’

अनियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहे. अशा परीस्थितीत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवावर्गाच्या सक्रीय सहभागाशिवाय लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही, असं रोहित पवार म्हणाले. तसंच आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रीय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळ हा युवांचा असेल, असं म्हणालो. परंतु या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते, याचा प्रत्यय काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या पाहून आला. उलट अनेकदा लोकहिताची कामं करताना ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं, पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली जातेच असं नाही.

‘पक्षातील कोणत्याही पदांबाबत बोललो नाही’

मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही, असंही रोहित पवार यांनी सांगितलं आहे.