राज्यात ‘एक (डाऊट) फुल , दोन हाफ ‘ नवा सिनेमा लागलाय, पण…; सामनातून युती सरकारवर घणाघात

Saamana Editorial on CM Eknath Shinde : खातेवाटपाची चर्चा 'वर्षा'वर व्हायला हवी होती पण ती 'सागर' बंगल्यावर झाली, याचाच अर्थ...; सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर टीकास्त्र

राज्यात एक (डाऊट) फुल , दोन हाफ  नवा सिनेमा लागलाय, पण...; सामनातून युती सरकारवर घणाघात
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Shivsena BJP NCP Marathi News
| Updated on: Jul 05, 2023 | 10:44 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये 2 जुलैला सामील झाले. त्यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथही घेतली. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे. राज्यातील एका वर्गाकडून अजित पवार यांच्या या कृतीचं समर्थन होतंय. तर काहीजण याचा कडाडून विरोध करत आहेत. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून या युती सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्यात ‘एक (डाऊट) फुल , दोन हाफ ‘ नवा चित्रपट लागलाय, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा

फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, नंतर ते शिंद्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राची ही अवस्था म्हणून ‘ एक फुल दोन हाफ ‘ अशीच झाली आहे . पण जो फुल आहे तोसुद्धा ‘ डाऊटफुल ‘ असल्याने चिंताग्रस्त चेहऱ्याने वावरतो आहे . जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे . ‘ एक ( डाऊट ) फुल , दोन हाफ ‘ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे . पण लोकांचा त्यावर बहिष्कार आहे!

महाराष्ट्रात भाजपने जे केले त्यामुळे संपूर्ण देशात त्यांची छिः थू होत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनाच काय ते पक्षात घेऊन पद वाटप करायचे बाकी आहे. या तिघांपैकी एकास पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार, दुसऱ्यास निती आयोग व तिसऱ्यास देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेमले जाईल. कारण भ्रष्टाचार, लुटमार, नैतिकता हा आता त्यांच्यासाठी मुद्दा राहिलेला नाही.

अजित पवारांनी फडणवीस यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सोमवारी हे ‘चक्की पिसिंग’ फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर त्यांच्या गटाचे खातेवाटप करीत बसले, आश्चर्यच आहे! खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर व्हायला हवी होती, पण अजित पवार व त्यांचा गट पोहोचला ‘सागर’वर. हे आश्चर्यच म्हणायला हवे. मुख्यमंत्र्यांची ही अशी अवस्था केविलवाणी आहे व दिवसेंदिवस ती अधिकच दयनीय होत जाईल.

मोदी-शहा-फडणवीसांच्या व्यापारी राजकारणाने या परंपरेस चूड लावली आहे. आणखी एक आश्चर्य असे की, श्री. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत व अजित पवार, प्रफुल पटेल वगैरे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चिन्हासह आपलाच असल्याचे जाहीर करून टाकले.

शिवसेना फुटीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की, विधिमंडळातील फुटलेला गट म्हणजे पक्ष नव्हे. हे ‘फुटके’ पक्षावर दावा सांगू शकत नाही. हे सत्य असताना ‘पक्ष व चिन्ह’ आमचेच असे सांगणे हे फाजील आत्मविश्वासाचे लक्षण आहे. पण दिल्लीतील महाशक्तीने डोक्यात हवा भरली की हे फाजील आत्मविश्वासाचे फुगे फुगतात. शिवसेना जशी जागच्या जागी राहिली तसेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिसत आहे.