मेहबुबा मुफ्तींच्या ट्विटर डीपीला काश्मीरचा झेंडा!, “फुटिरांचा उत्सव सुरू, स्वातंत्र्याचं अमृत कुठंय?”, सामनातून शिवसेनेचा सवाल

Saamana Editorial : "फुटिरांचा उत्सव सुरू, स्वातंत्र्याचं अमृत कुठंय?", असा सवाल सामनातून शिवसेनेने विचारलाय.

मेहबुबा मुफ्तींच्या ट्विटर डीपीला काश्मीरचा झेंडा!, फुटिरांचा उत्सव सुरू, स्वातंत्र्याचं अमृत कुठंय?, सामनातून शिवसेनेचा सवाल
उद्धव ठाकरे, मेहबूबा मुफ्ती
| Updated on: Aug 05, 2022 | 7:16 AM

मुंबई : यंदा देशभरात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. याचा उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. अनेकांनी तिरंगा आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीला ठेवत यात आपला सहभाग नोंदवला आहे. तर दुसरीकडे जेकेपीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी नुकतंच आपला ट्विटरचा डीपी बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर केलाय. 2015 च्या एका रॅलीतील हा फोटो आहे. त्यासमोर तिरंग्यासह काश्मीरचा झेंडाही लावण्यात आलाय. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) यावरच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. “फुटिरांचा उत्सव सुरू, स्वातंत्र्याचं अमृत कुठंय?”, असा सवाल सामनातून शिवसेनेने विचारलाय. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

फुटिरांचा उत्सव सुरू

चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले. चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व 80 हजार वर्ग फूट जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्य मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे.

पीडीपीच्या अध्यक्षा व आझाद कश्मीरच्या समर्थक मेहबुबा मुफ्ती यांनी सरळ भारतीय सार्वभौमत्वालाच आव्हान दिले. श्रीमती मुफ्तींकडून त्यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर कश्मीरचा ध्वज फडकवला. तिरंग्याच्या बाजूला कश्मीरचा ध्वज, असे हे चित्र आहे. कश्मीरातून 370 कलम रद्द केले, तसा हा त्यांचा स्वतंत्र ध्वजही रद्द केला. मोदी व अमित शहा प्रभृतींनी कश्मीर आता शंभर टक्के हिंदुस्थानचे अविभाज्य अंग झाल्याचे जाहीर करून आनंदोत्सवही साजरे केले, पण कश्मिरी पंडितांचे हाल असोत की फुटीरतावाद्यांचे दळभद्री खेळ, काहीच बदलल्याचे दिसत नाही. फुटीरतावादी संघटनांचे विषारी नाग फूत्कार सोडीतच आहेत.

मेहबुबांना हात लावण्याची हिंमत केंद्रात नाही!

स्वातंत्र्याची मशाल पेटवणाऱ्या ‘यंग इंडिया’, ‘नॅशनल हेराल्ड’ लाच टाळे ठोकले जात आहे. मुंबईत संजय राऊत यांना ‘ईडी’कडून अडकवून ‘सामना’चा आवाज व लढा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘हेराल्ड’ व ‘सामना’ ही दोन्ही माध्यमे प्रखर राष्ट्रवादी आहेत हे महत्त्वाचे, पण कधीकाळी भाजपच्या गळय़ात गळा घालून राजकारण करणाऱ्या, फुटीरतावादाचे विष आजही पेरणाऱ्या आणि आपल्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर ‘कश्मीर’चा ध्वज फडकविणाऱ्या मेहबुबांना हात लावण्याची हिंमत केंद्रातील सरकारमध्ये नाही.