“आम्हाला गरज नसताना बच्चू कडू, यड्रावकर यांना संधी दिली”, मविआच्या नेत्यांचं वक्तव्य

| Updated on: Nov 27, 2022 | 1:35 PM

बच्चू कडू, यड्रावकर यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्याचं टीकास्त्र

आम्हाला गरज नसताना बच्चू कडू, यड्रावकर यांना संधी दिली, मविआच्या नेत्यांचं वक्तव्य
Follow us on

कोल्हापूर : बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्याने जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीला अपक्षाची गरजही नव्हती. तरीही बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांना (Rajendra Patil Yadravkar) संधी दिली, असं विधान ठाकरे गटाचे नेते, आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केलं आहे.

बच्चू कडू यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात शालेय शिक्षण राज्यमंत्रीपद होतं. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचं राज्यमंत्रीपदाची बच्चू कडू यांच्याकडे होतं. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना ही खाती देण्यात आली होती.

राजेंद्र पाटील यड्रावकर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या खात्याचे राज्यमंत्री राहिले आहेत.

सचिन अहिर यांनी सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलंय. सध्या राजकारण खालच्या थराला गेलंय. हे दुर्दैव आहे. कुणाचं संतुलन बिघडलं आहे जनता ठरवेल. हे मात्र नक्की शिंदेगटाने राजकीय संतुलन बिघडवलं आहे, असं आहिर म्हणालेत.

राज्य सरकारला राज्यपालांना परत पाठवायचा असतं, तर त्यांनी राज्यपालांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायला हवं होतं.एका बाजूला केंद्राशी बोललोय म्हणता दुसऱ्या बाजूला जे चाललंय त्याला समर्थन देता, हे योग्य नाही. हिंमत असेल तर राज्यपालांनी बोलावलेल्या एकाही कार्यक्रमाला जाणार नाही, असं जाहीर करा. कोश्यारींना परत पाठवा असं आम्ही आज नाही अडीच वर्षापासून म्हणतोय, असंही अहिर म्हणालेत.

राज्यपालांना परत पाठवा, या संभाजीराजेंच्या मागणीला आमचं समर्थन आहे, असंही त्यानी सांगतलं आहे.